Eknath Shinde : मुख्यमंत्री जरांगेंच्या भेटीला जाणार, दौराही आला; पण व्हिडीओ व्हायरल होताचं दौरा रद्द झाला
CM Eknath Shinde : मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांचा जालना दौरा आता रद्द झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे
औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या पंधरा दिवसांपासून जालना येथील मनोज जरांगे उपोषण करत आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संध्याकाळी पाच वाजता मनोज जरांगे यांची भेट घेणार होते. याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा देखील आला होता. मात्र काही वेळापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जरांगे यांच्यासोबत आमची अजून चर्चा सुरू असल्याचं म्हटले आहे. तर, मुख्यंमत्री यांचा हा दौरा आता रद्द झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एकनाथ शिंदे जरांगे यांच्या भेटीला आज संध्याकाळी जाणार होते. मात्र त्यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यात, मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते की, "आपल्याला काय? बोलायचं अन् निघून जायचं, बोलून मोकळं व्हायचं....त्यावर अजित पवार म्हणाले हो....तर माईक चालू आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. आता याच व्हिडिओ वरून एकनाथ शिंदे यांना ट्रोल केलं जात आहे. तसेच विरोधकांकडून देखील टीका होत आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री शिंदे यांचा आंतरवाली येथील दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
मुख्यमंत्र्यांचा दौराही आला...
मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी आपण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्तेच उपोषण सोडणार असल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे जरांगे यांची भेट घेणार असल्याची चर्चा होती. विशेष म्हणजे काही तासांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांचा आजचा आंतरवाली दौरा देखील आला होता. ज्यात 4. 15 वाजता मुख्यमंत्री शासकीय विमानाने औरंगाबाद विमानतळावर दाखल होणार होते. त्यानंतर औरंगाबाद विमानतळावरून हेलिकॉप्टरने जालना येथील अंकुशराव टोपे साखर कारखान्यात त्यांचे आगमन होणार होते. मात्र, आता हा दौरा रद्द करण्यात आला आहे. मुख्यंमत्री यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने हा दौरा रद्द करण्यात आल्याची देखील चर्चा आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :