झोपेत विषारी साप चावला, 13 वर्षांच्या मुलीचा अंथरुणातच मृत्यू, छत्रपती संभाजीनगरची घटना
वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले. मात्र साप विषारी असल्याने आणि वेळेत मोठे नुकसान झाल्याने वैष्णवीचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही.

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर शहरातील कर्णपुरा भागात सर्पदंशामुळे एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्यरात्री अंथरुणावर झोपलेल्या 13 वर्षीय मुलीला विषारी सापाने दंश केला. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
झोपेतच सर्पदंश, मुलीचा मृत्यू
मृत मुलीचे नाव वैष्णवी अखिलेश पवार (वय 13) असे आहे. वैष्णवीचे वडील बांधकाम क्षेत्रात काम करतात. शनिवारी मध्यरात्री सुमारे दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. वैष्णवी घरातील अंथरुणावर झोपलेली असताना अचानक विषारी साप घरात घुसला आणि तिला दंश केला. झोपेतच झालेल्या या घटनेने कुटुंबियांना धक्का बसला. मुलीला साप चावल्याचे लक्षात येताच तिच्या वडिलांनी व इतर कुटुंबीयांनी तत्काळ तिला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात नेले. वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले. मात्र साप विषारी असल्याने आणि वेळेत मोठे नुकसान झाल्याने वैष्णवीचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही.
या घटनेमुळे कर्णपुरा भागात शोककळा पसरली आहे. अवघ्या 13 व्या वर्षी वैष्णवीचे निधन झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, शहर व ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे साप बाहेर पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. नाले, गटारे आणि झुडपांमधून बाहेर आलेले साप घरे व शेतात शिरत आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांचा धोका वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
पावसाळ्यात ओलसर जागांवर सापांचा सुळसुळाट
तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात अंधाऱ्या व ओलसर जागी साप लपून बसतात. घराभोवतीच्या झुडपांची स्वच्छता ठेवणे, अंथरुण जमिनीवर न घालणे, तसेच रात्री झोपताना टॉर्च किंवा दिव्याचा वापर करणे आवश्यक आहे. सर्पदंश झाल्यास तातडीने रुग्णालयात नेणे, विलंब न करता उपचार घेणे हेच प्राण वाचवण्याचे मुख्य साधन आहे.कर्णपुरा भागातील या घटनेने पुन्हा एकदा नागरिकांना सर्पदंशाच्या धोक्याची जाणीव करून दिली आहे.

























