Health Department Recruitment : प्रत्येक नागरिकाला चांगली आरोग्य सेवा मिळावी या हेतून येत्या दोन महिन्यात 15 हजार जागांची भरती (Jobs) केली जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिली आहे. राज्यस्तरीय 'अवयवदान जनजागृती अभियान'चे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर शहरातील (Chhatrapati Sambhaji Nagar City) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथे पार पडले. यावेळी महाजन बोलत होते.


यावेळी बोलताना महाजन म्हणाले की, लोकसंख्या जास्त आणि डॉक्टरांची संख्या कमी ही अवस्था संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. प्रत्येक नागरिकाला चांगली आरोग्य सेवा मिळावी या हेतून येत्या दोन महिन्यात 15 हजार जागांची भरती केली जाईल असे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आगामी काळात आरोग्य विभागात मोठी भरती होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, गेल्या सरकारमध्ये देखील आरोग्य भरती करण्याचा निर्णय झाला, पण यासाठी घेण्यात आलेली परीक्षा आणि निवडपद्धत वादात सापडली होती. तर यावेळी मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा देखील आरोप झाला होता. त्यामुळे यावेळी आरोग्य विभागात होणारी पदभरती कशी असणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे


अवयदान करण्याबाबत जनजागृती गरजेची 


देशभरात तसेच राज्यात विशिष्ट कारणामुळे अवयव निकामी झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे व त्याकरिता अवयवाची मोठी गरज असल्याचे महाजन म्हणाले. समाजातील काहीशा गैरसमजामुळे अवयव दान करण्यात येत नाही.पाश्चिमात्य देशात 10 हजार लोकसंख्येमागे अवयवदान करणाऱ्यांची संख्या 3500 आहे तर हेच प्रमाण आपल्या देशात केवळ 1 आहे. त्यामुळे अवयदानबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. त्याकरिता अवयव दान जागृती अभियान राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगीतले पुढील काळात जिल्हा निवड समितीच्या मार्फत 4500 पदांना भरतीची मंजूरी देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. ही प्रक्रीया पुढील दोन महिन्यात पुर्ण करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले या अभियानामध्ये जनतेचे मोलाचे योगदान आवश्यक असल्याचे आवाहन महाजन यांनी केले.


दानवेंची संपूर्ण शरीर दान करण्याची घोषणा 


जास्तीत जास्त डॉक्टर निर्माण व्हावे म्हणूने मेडीकल कॉलेज उघडणार, औषधींसाठी मोठा फंड उभारणे, ग्रामीण भागात जाऊन जनजागृती करणे आदी कामे हाती घेण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले. यावेळी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आपले संपूर्ण शरीर दान करीत असल्याची घोषणा यावेळी केली. या वेळी मंचावर पालकमंत्री संदीपान भुमरे, केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे, खा. इमतीयाज जलील, विरोधीपक्ष नेते (ठाकरे गट) अंबादास दानवे उपस्थित होते.


महत्वाच्या इतर बातम्या : 


Congress On Sharad Pawar: अदानी प्रकरणी JPCच्या मागणीला शरद पवारांचा पाठिंबा नाही; काँग्रेस म्हणतंय...