Aurangabad News : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करुन कर्जबाजारी झालेल्या एका अभियंत्याने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना पडेगाव परिसरातील तारांगण सोयायटीत उघडकीस आली. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. गणेश श्रीहरी चव्हाण (वय 35 वर्षे, पडेगाव, तारांगण सोसायटी) असे मृत अभियंत्याचे नाव आहे. तर आत्महत्या करण्यापूर्वी गणेश याने 'बाबा, मला माफ करा, मी तुमचे पैसे गमावले' अशी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे.
अनेक वर्षांपासून गणेश शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायचा. मार्केटमध्ये तोटा झाल्याने तो कर्जबाजारी झाला होता. तसेच त्याने वडिलांचे पेन्शनचे पैसेही गुंतवले होते. त्यामुळे तो काही दिवसांपासून तणावात होता. गणेशची पत्नी मुलासह माहेरी गेली होती. घरात एकटा असलेल्या गणेशने एक चिठ्ठी लिहून साडीने गळफास घेतला. यादरम्यान गणेशच्या पत्नीने त्याच्या मोबाइलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद मिळत नसल्याने तिने शेजाऱ्यांना माहिती दिली. यावरुन शेजारी राहणाऱ्या महिलांनी घरात डोकावले असता गणेश लटकलेल्या अवस्थेत दिसला.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच छावणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गणेशला घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी घरातून एक सुसाईड नोट जप्त केली. त्यात आपण कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत आहोत, असा उल्लेख असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर पुढील तपास छावणी पोलीस करत आहेत.
घटनास्थळी सुसाईड नोट मिळाली
शेअर मार्केटमध्ये तोटा झाल्याने गणेश अडचणीत सापडला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तणावात असलेल्या गणेशने आत्महत्या करत टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट मिळाली आहे. ज्यात 'बाबा, मला माफ करा, मी तुमचे पैसे गमावले' असा उल्लेख करण्यात आलेला आहे. दरम्यान गणेशच्या या आत्महत्याच्या निर्णयाने कुटुंबातील सदस्यांना मोठा धक्का बसला आहे. तर परिसरात या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.
कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या
दुसऱ्या एका घटनेत, सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे आलेल्या आर्थिक अडचणींना कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सोनुबा विठ्ठल कळवत्रे (वय 40 वर्षे) असे या शेतकऱ्याचं नाव आहे. सोनुबा कळवत्रे यांच्यावर राष्ट्रीयकृत व खाजगी बँकांचे दोन लाख रुपयांचे कर्ज आहे. त्यात कमी पावसात खरिपामध्ये पिकांची मोडतोड होत असल्याने बियाण्यासाठी पैसे कुठून आणावेत या विवंचनेतून सोनुबा यांनी टोकाचे पाऊल उचलले. मृत्यूपूर्वी त्यांनी दोन पानांची चिठ्ठी लिहून ठेवली आहे. खरीप हंगामासाठा पैसे नसल्याने दोन पानांची चिट्ठी लिहून कर्जबाजारीपणा आणि आर्थिक तंगीमुळे आत्महत्या करत असल्याचे सांगून सोनुबा यांनी शनिवारी 11 वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. सोयगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून या प्रकरणाची नोंद केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
औरंगाबादेतील 'आदर्श घोटाळ्या'चा पहिला बळी; पतसंस्थेतील 22 लाख रुपये बुडण्याच्या धास्तीने आत्महत्या