Aurangabad News : औरंगाबादच्या (Aurangabad) आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळा समोर आला होता. दरम्यान आता घोटाळ्यात पहिला बळी गेला असून, एका ठेवीदाराने आत्महत्या केली आहे. पतसंस्थेत 22 लाख रुपयांची ठेव बुडाल्याच्या भीतीने 38 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना औरंगाबाद तालुक्यातील लाडगाव येथे घडली असून, रामेश्वर नारायण इथर असे मृताचे नाव आहे. रामेश्वर यांनी मुलीच्या शिक्षणाची आणि लग्नाची तजवीज म्हणून ही रक्कम पतसंस्थेत जमा केली होती. 


नियमबाह्य कर्जवाटप करुन ओळखीतल्याच लोकांना, स्वतःच्याच इतर संस्थांना कोट्यवधींच्या कर्जाची खैरात वाटल्याचा घोटाळा औरंगाबाद शहरातील आदर्श नागरी सहकारी संस्थेत समोर आला आहे. या प्रकरणात तब्बल 200 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचे बोलले जात आहे. उपनिबंधक कार्यालयाकडून  करण्यात आलेल्या लेखापरीक्षणात हा सर्व प्रकार समोर आला आहे.  त्यानंतर शहरातील सिडको पोलीस ठाण्यात मंगळवारी (11 जुलै) रोजी मुख्य संचालक अंबादास आबाजी मानकापेंसह अन्य मंडळ, कर्जदारांवर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर याच पतसंस्थेत 22 लाख रुपयांची ठेव बुडाल्याच्या भीतीने रामेश्वर नारायण इथर या 38 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. रामेश्वर यांनी मुलीच्या शिक्षणाची आणि लग्नाची तजवीज म्हणून ही रक्कम पतसंस्थेत जमा केली होती. तर रामेश्वर यांचे वडील नारायण इथर यांच्या नावे या पतसंस्थेत साडेआठ लाख रुपये, आई कासाबाई यांच्या नावे 9 लाख रुपये आणि मुलगी अश्विनीच्या नावे 5 लाख रुपयांच्या ठेवी ठेवल्या होत्या. 


नेमका हा घोटाळा काय?


आदर्श नागरी सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाने ठराविक ठेवीदारांना नियमबाह्य कर्जाची खैरात वाटल्याचा आरोप आहे. आदर्श ग्रुप अंतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या जवळपास 15 संस्थांना कर्ज वाटप केले. तर काही नातेवाईक, ओळखींच्या नावे कर्ज उचलण्यात आल्याचा आरोप आहे. यासाठी विनातारण, विनाजामीनदार, बनावट तारण व सभासद उभे करण्यात आल्याचे  उपनिबंधक कार्यालयाकडून  करण्यात आलेल्या लेखापरीक्षणात समोर आले आहे. ज्यात 2016 ते 2019 मध्ये 103 कोटी 16 लाख 73 हजार 381 रुपयांचा घोटाळा केला. तर 2018 ते 2023 मध्ये 99 कोटी सात लाख 90 हजार 579 रुपयांचा घोटाळा केला. 2019 मध्ये 23 कर्ज प्रकरणात कागदपत्रेदेखील अपूर्ण आहेत, तर 2021 मध्ये अर्ज अपूर्ण असताना कर्जवाटप झाले असल्याचे तपासात समोर आल्याने गुन्हा दाखल करण्यात आले आहे. 


मुख्य संचालक अंबादास मानकापेंना अटक 


आदर्श नागरी सहकारी संस्थेत झालेल्या घोटाळ्यात पोलिसांनी गुन्हा दाखल करताच मुख्य संचालक अंबादास आबाजी मानकापेंसह अन्य आरोपी फरार झाले होते. दरम्यान पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु होता.  दरम्यान अंबादास मानकापे यांना अखेर शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. अटकपूर्व जामिनासाठी कागदपत्रांवर सह्या करण्यासाठी गोलवाडीत येताच मोठ्या चतुराईने सिडको पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांना खबऱ्याकडून खात्रीलायक माहिती मिळाली होती, त्यानुसार सापळा लावत मानकापेंना अटक करण्यात आली आहे. 


संबंधित बातम्या: 


Adarsh Scam: राज्यात आणखी एक 'आदर्श' घोटाळा; ना तारण, ना प्रक्रिया, आपल्याच संस्थांना कोट्यवधींचे कर्जवाटप