Adarsh Scam : औरंगाबादच्या (Aurangabad) आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत नियमबाह्य कर्ज वाटप करुन तब्बल 200 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार लेखा परीक्षकांच्या अहवालानंतर समोर आला आहे. दरम्यान या प्रकरणी संचालक मंडळावर शहरातील सिडको पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आल्याने ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. तर ठेवी परत मिळाव्यात आणि गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ठेवीदार संघर्ष कृती समितीच्यावतीने आज (17 जुलै) रोजी सकाळी 11 वाजता पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. 


आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत अनियमित कारभाराची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. दरम्यान या संस्थेच्या लेखा परीक्षणात नियमबाह्य पद्धतीने अब्जावधींचे कर्जवाटप केल्याचा ठेपका संचालक मंडळावर ठेवला आहे. त्यामुळे 200 कोटी रुपयांच्या बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता आपल्या ठेवी परत मिळतील की नाही, अशी भीती ठेवीदारांना वाटत आहे. तर घोटाळा समोर आल्यावर एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. दरम्यान या सर्व प्रकरणात ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळावे आणि आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीने धडक मोर्चा काढला जाणार आहे. सकाळी 11 वाजता क्रांतीचौकातून पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढला जाणार आहे. तर या मोर्च्यात 500 ते 600 ठेवीदार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 


आदर्श घोटाळ्याप्रकरणी जवळपास 50 जणांवर गुन्हे दाखल असून काही संचालकांना अटक केली आहे. पण इतर संचालक, अधिकारी अद्याप फरार आहेत. त्यांनाही अटक करावी, ठेवीदारांचे पैसे परत करण्याबाबत ठोस पावले उचलावीत अशी मागणी ठेवीदार करत आहे. तर इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पथक नेमण्यात आले आहेत. 


जलील म्हणतात मोर्चा निघणारच... 


पोलिसांनी सुरुवातीला वाहतूक कोंडी आणि कायदा सुव्यवस्था असे कारण देत मोर्चाची परवानगी नाकारली होती. मात्र जलील यांनी आक्रमक भूमिका घेतल्यावर मोर्चाला परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान यावर बोलताना जलील यांनी म्हटलं आहे की, "लोकशाहीत प्रत्येक व्यक्तीला अन्यायाविरुद्ध आंदोलन करण्याचा अधिकार आहे. येथे आदर्श नागरी सहकारी संस्थेच्या अध्यक्ष व संचालकांनी केलेल्या फसवणुकीमुळे शेकडो ठेवीदारांचे कष्टाचे पैसे बुडाले आहेत. असे असताना पोलीस वाहतुकीचा प्रश्न निर्माण होईल म्हणून मोर्चाला परवानगी नाकारत आहेत. पोलिसांनी कधी कोणत्या राजकीय पक्षाचा मोर्चा याच कारणासाठी रोखला का? मग आता का? फक्त ते असहाय्य लोक आहेत जे त्यांचे पैसे परत मिळवण्यासाठी लढत आहेत. पोलिसांवर दबाव आहे का?"  


इतर महत्वाच्या बातम्या: 


Adarsh Scam : 'माझे वय झालं, काहीच आठवत नाही', 'आदर्श घोटाळा' करणाऱ्या मानकापेचं पोलिसांना अजब उत्तर