औरंगाबाद : देशभरात बुधवारी (30 ऑगस्ट) बहीण-भावाचा सण म्हणजेच रक्षाबंधन (Raksha Bandhan 2023) साजरा केला जात असतानाच, औरंगाबादमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रक्षाबंधनाच्या दिवशीच भावाने आपल्या बहिणीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. बलुजा भागातील बजाजनगरात बुधवारी ही घटना उघडकीस आली. आकाश सर्जेराव शिंदे (वय 30 वर्षे, रा. खैरका, ता. मुखेड, जि नांदेड) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. 


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आकाश एका कंपनीत काम करत होता. दरम्यान तो औरंगाबाद येथे बहिणीच्याच घरी वास्तव्यास होता. तर, त्याची बहीण सुनंदा गोविंद गोंधळे याही एका कंपनीत कामाला आहेत. सुनंदा व त्यांचे पती गोविंद गोंधळे हे दोघे बुधवारी सकाळी नित्याप्रमाणे कामासाठी निघून गेले. रक्षाबंधन असल्याने मी आज घरीच थांबतो असे आकाशने बहिणीला सांगितले होते. तसेच कामावरुन आल्यानंतर रक्षाबंधन साजरा करण्याचे त्यांनी ठरवले होते.


कामावर गेलेल्या सुनंदा दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घरी आल्या होत्या. बराच वेळ आवाज देऊनही आकाश दरवाजा उघडत नसल्याने सुनंदा यांनी खिडकी उघडून घरात पाहिले असता, आकाश गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. आकाशला अशा अवस्थेत पाहून बहिणीने हंबरडा फोडला. दरम्यान याची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करुन पंचनामा केला आहे. तर या प्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पण आकाशने आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. 


चिठ्ठी लिहून ठेवली...


मागील काही दिवसांपासून तणावात असलेल्या आकाशने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली असल्याचे देखील समोर आले आहे. 'ताई मला माफ कर, आईची काळजी घे' असे यात उल्लेख असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. रक्षाबंधनाच्या दिवशीच ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


युवकाची गळफास घेऊन आत्महत्या


दुसऱ्या एका घटनेत 19 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री बजाजनगरात समोर आली आहे. रोहन रमेश भिसे (रा. प्रवरानगर रोड, लोहगाव, जि. अहमदनगर) असे तरुणाचे नाव आहे. बजाजनगरातील संत गाडगेबाबा सोसायटीत रोहन दोन मित्रांसोबत भाड्याने राहत असे. बुधवारी सकाळी रोहनने आपल्या मित्रांना मला महाविद्यालयात जायचे आहे, असे सांगून घरी थांबला. रात्री मित्र आले असता ही घटना उघडकीस आले. त्याने हे टोकाचे पाऊल का उचलेले याबाबत कळू शकले नाही.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Raksha Bandhan 2023: राज्यातल्या रक्षाबंधनावर भद्राचं सावट नाहीच.. व्हायरल मेसेजला बळी पडू नका, ज्येष्ठ पंचागकर्त्यांचं आवाहन...