औरंगाबाद लोकसभेवर पहिल्यांदाच 'भाजप'चा अधिकृत दावा; म्हणे गटबाजीमुळे शिवसेनेची ताकद कमी झाली...
Aurangabad Lok Sabha Constituency: केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी आता औरंगाबाद लोकसभा मतदारसंघावर भाजपचा उघडपणे दावा केला आहे.
Aurangabad Lok Sabha Constituency: लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) अनुषंगाने सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. तर वेगेवेगळ्या पक्षाकडून वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघावर आता दावे देखील केली जात आहे. अशातच भाजप-शिवसेनेच्या (BJP-Shiv Sena) युतीत सेनेकडे असलेला औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपकडून मागील काही दिवसांपासून जोरदार तयारी केली जात आहे. भाजप नेत्यांकडून याबाबत अनेक बैठका देखील झाल्या होत्या. मात्र, आजपर्यंत भाजपच्या नेत्यांनी उघडपणे आणि अधिकृतरित्या या मतदारसंघावर दावा केला नव्हता. पण केंद्रीय मंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी आता औरंगाबाद लोकसभा मतदारसंघावर भाजपचा उघडपणे दावा केला आहे. शिवसेना पक्षात गटबाजी झाल्याने त्यांची ताकद कमी झाली आहे. त्यामुळे भाजपकडे हा मतदारसंघ सोडण्याची मागणी देखील कराड यांनी केली आहे.
दरम्यान यावर बोलताना भागवत कराड म्हणाले की, औरंगाबाद ग्रामीण असेल किंवा शहर असेल. सर्वांचीच इच्छा आहे की, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपनेच लढावी. त्यामुळे भाजपच्या बूथ प्रमुखापासून तर लोकसभा प्रभारीपर्यंत सर्वच यासाठी रात्र-दिवस काम करत आहेत. शिवसेनेत दोन गट झाल्याने एक गट एकनाथ शिंदे आणि दुसरा गट उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. त्यामुळे शिवसेनेची ताकद नक्कीच कमी झाली आहे. दुसरीकडे भाजपची संघटनेच्या दृष्टीने ताकद वाढली आहे. त्यामुळे औरंगाबाद लोकसभेची जागा भाजपला मिळावी अशीच सर्वांची इच्छा आहे. तर, मी सुद्धा इच्छुक उमेदवार आहेत."
शिंदे गट माघार घेणार का?
आतापर्यंत शिवसेना-भाजप युतीत हा मतदारसंघ नेहमी शिवसेनेच्या ताब्यात राहिला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सलग चारवेळा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे. पण, गेल्यावेळी 2019 मध्ये त्यांचा इम्तियाज जलील यांनी पराभव केला होता. आता शिवसेनेत गटबाजी झाल्याने शिंदे गट भाजपसोबत आहे. तर, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडेच (शिंदे गट) असणार असल्याचा दावा शिंदे गटाचे मंत्री संदिपान भुमरे यांनी यापूर्वीच केला आहे. पण, आता भाजपने देखील दावा केल्याने शिंदे गट माघार घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोणत्या मतदारसंघात कोणाचा दावा?
दरम्यान, फक्त सत्ताधारीच नव्हे तर विरोधी पक्षात देखील वेगवेगळ्या पक्षात वेगवेगळ्या जागेवर दावे केले जात आहेत. ज्यात माढा लोकसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीत काँग्रेसने दावा केला आहे. शिरुर मतदारसंघावर ठाकरे गटाने दावा केला आहे. औरंगाबादमध्ये भाजपने दावा केला आहे. खडकवासला मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला आहे. हडपसर मतदारसंघात शिवसेनेने दावा केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
खैरेंनी औकात काढली, भुमरे म्हणाले लोकसभेत दाखवतो'; लोकसभा निवडणुकीवरून शिंदे-ठाकरे गटात वाद पेटला