Aurangabad Crime News : औरंगाबाद (Aurangabad) शहरात अवैध धंदे वाढले असून, पोलिसांचा धाकच राहिला नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) सोमवारी सभागृहात करत असतानाच दुसरीकडे त्याच औरंगाबाद शहरात भरदिवसा एका व्यावसायिकाची तीन लाख रुपये असणारी बॅग लंपास करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार शहरातील गजबजलेल्या आणि महत्वाचा चौक असलेल्या क्रांती चौकाजवळील पेट्रोल पंपावर घडला. तर ही घटना भरदिवसा दुपारी 2 .50 वाजता घडली. त्यामुळे आता औरंगाबाद शहरात पोलीस आहेत की नाही? पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक उरला की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.   


औरंगाबाद शहरात भर दिवसा लूटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बँकेतून पैसे काढून जात असलेल्या व्यापाऱ्यावर पाळत ठेवून, संधी मिळताच तीन लाखांची बॅग पळवतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, यामुळे खळबळ उडाली आहे. व्यापारी नवाब जमीर खान पठाण यांनी जिल्हा न्यायालयासमोरील आयसीआयसीआय बँकेतून तीन लाखांची रक्कम काढली होती. त्यानंतर ते तेथून निघाल्यावर अचानक दोन जण पार्किंग भागात भेटले आणि त्यांनी तुमचे पैसे खाली पडले आहेत असं सांगितले. त्यांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. मात्र हे पैसे माझे नसल्याचे उत्तर नवाब जमीर खान पठाण यांनी देत पुढे जाण्याचा निर्णय घेतला. त्याच दोघांनी नंतर त्यांचा पाठलाग करायला सुरुवात केली. पुढे गेल्यावर पठाण यांना आपली दुचाकी पंक्चर असल्याचं लक्षात आलं. तिथून त्यांनी गाडी ढकलून क्रांती चौक पेट्रोल पंपवर नेली. तिथेच या चोरांनी डाव साधत तीन लाख रुपये असलेली बॅग पळवली. पंक्चर काढणाऱ्या व्यक्तीने चोरट्यावर हातोडा फेकून मारला, तरी देखील ते पसार होण्यात यशस्वी झाले.


पोलिसांना दुचाकीस्वार चोरट्यांचे फुटेज मिळाले आहेत. दुचाकी चालकाच्या डोक्यात हेल्मेट असून पाठीमागे बसलेल्या चोराच्या तोंडाला मास्क असल्याचे दिसून आले. दुचाकीवर समोर आणि पाठीमागेही नंबर नव्हता. या प्रकरणी क्रांती चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या घटनेनंतर आता पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न उपस्थित केला जात आहे. 


सत्ताधारीच गुन्हेगारीत मग कारवाई होणार कशी? 


औरंगाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सुरु असून शहरात 70 टक्के गुन्हेगारीचा आलेख वाढला आहे. या अवैध व्यवसायांना पोलिसांच संरक्षण आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी अधिवेशनात केला आहे. औरंगाबादेत वाढत असलेल्या गुन्हेगारी व अवैध व्यवसायाकडे अंबादास दानवे यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले. तसेच अवैध व्यवसायिकांकडून कशाप्रकारे वसुली केली जाते त्याची फोन नंबरसहित यादीच दानवे यांनी सभापती यांच्याकडे सुपूर्द केली. विशेष म्हणजे पोलीस आयुक्तालयाच्या संरक्षणात भाजप कार्यकर्त्यांचे अवैध धंदे सुरु असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे. त्यामुळे सत्ताधारीच गुन्हेगारीत असेल तर कारवाई होणार कशी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


पोलीस आयुक्तालयाच्या संरक्षणात चालतात भाजप कार्यकर्त्यांचे अवैध धंदे; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप