Aurangabad Crime News : मागील काही दिवसांपासून औरंगाबाद (Aurangabad) शहरात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय वाढल्याचे चित्र आहे. पोलिसांचा धाकच उरला नसल्याचा आरोप होत आहे. दरम्यान औरंगाबाद शहरातील अवैध व्यवसायाचा मुद्दा आता अधिवेशनात गाजल्याचे पाहायला मिळाले. कारण औरंगाबाद शहरातील वाढत्या अवैध व्यवसायाचा मुद्दा विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सभागृहात मांडला. विशेष म्हणजे पोलीस आयुक्तालयाच्या संरक्षणात भाजप कार्यकर्त्यांचे अवैध धंदे सुरु असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सुरू असून शहरात 70 टक्के गुन्हेगारीचा आलेख वाढला आहे. या अवैध व्यवसायांना पोलिसांच संरक्षण आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. औरंगाबादेत वाढत असलेल्या गुन्हेगारी व अवैध व्यवसायाकडे अंबादास दानवे यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले. तसेच अवैध व्यवसायधारकांकडून कशाप्रकारे वसुली केली जाते त्याची फोन नंबरसहित यादीच दानवे यांनी सभापती यांच्याकडे सुपूर्द केली.
ज्या भागात जुगार सुरू आहे तेथे दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी धाडी टाकल्या आहेत. शहरात जुगाराचे पैसे पाठविण्यासाठी ठिकठिकाणी क्यू आर कोड लावले असल्याची माहितीही दानवे यांनी सभागृहात दिली. तसेच भाजपचा डोंनगावकर नावाचा कार्यकर्ता लॉटरी चालवितो, या अवैध व्यवसायाला पोलीस आयुक्तालय कार्यालयातून संरक्षण दिल जातं. जुगार, मुरूम, वाळू तस्करी या गुन्हेगारांना गुन्हे निहाय पोलीस स्टेशनमध्ये बोलावून एक पोलीस अधिकारी पैसे वाढवून देण्यास सांगतो. त्यामुळे असे कृत्य करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल का? असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला.
दानवेंच्या प्रश्नाला फडणवीसांचे उत्तर...
दरम्यान दानवे यांनी केलेल्या गंभीर आरोपीची सरकारकडून दखल घेण्यात आली आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना म्हटले की, विरोधी पक्षनेते यांनी सादर केलेली यादी मला पाठवा, त्यातील फोन नंबर तपासले जातील. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. संपूर्ण चौकशी केली जाईल, असे फडणवीस म्हणाले आहे.
पोलिसांचा वचक कमी झाला का?
गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहरातील अवैध धंधे मोठ्याप्रमाणात वाढले आहेत. उघडपणे नशेच्या गोळ्या मिळत असल्याने तरुण याच्या आहारी जात आहे. त्यामुळे गुन्हेगारी वाढली आहे. त्यातच शहरातील काही भागात गुंडगिरी टोळक्यांची दहशत पाहायला मिळत आहे. अनेक भागात जुगार अड्डे चालत आहे. तर वाळूज भागात अनेक अवैध धंधे सुरु असून, पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यापूर्वीच दानवे यांनी केला होता.
इतर महत्वाच्या बातम्या:
कश्यप गँगच्या गुंडांची पोलिसांनी काढली रस्त्यावरुन धिंड; भाईगिरी मोडून काढण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न