Chhatrapati Sambhaji Nagar: नामांतराविरोधात आक्षेप दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस, गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त
Chhatrapati Sambhaji Nagar : आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज घेऊन येणाऱ्या व्यक्तीलाच कार्यालयात प्रवेश दिला जाणार असून, त्यानंतर कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही.
Chhatrapati Sambhaji Nagar News : औरंगाबाद शहराचे (Aurangabad City) नाव बदलून छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) करण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य शासनाने घेतला आहे. दरम्यान शासनाच्या या निर्णयाविरोधात आक्षेप आणि हरकती असल्यास त्या विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या होत्या. तर आक्षेप आणि हरकती दाखल करण्यासाठी आज (27 मार्च) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज विभागीय आयुक्त कार्यालयात आक्षेप आणि हरकतीसोबतच नामांतराच्या समर्थनार्थ अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त कार्यालयात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तर आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज घेऊन येणाऱ्या व्यक्तीलाच कार्यालयात प्रवेश दिला जाणार असून त्यानंतर कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही.
छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधात आतापर्यंत 1 लाख 48 हजार 203 हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. तर समर्थनार्थ केवळ 4 हजार 166 सूचना आणि 774 पोस्ट कार्ड विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवक जावक विभागात जमा करण्यात आले आहे. तर आज शेवटच्या दिवशी दोन्ही बाजूने लाखो अर्ज विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल होण्याची शक्यता आहे. शहराचे नाव औरंगाबाद कायम असावे या मागणीसाठी शेवटच्या मुदतीपर्यंत 4 लाखांपेक्षा अधिक अर्ज दाखल केले जाणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनार्थ आज आम्ही 2 लाख अर्ज विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल करणार असल्याची माहिती भाजप नेत्यांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आज अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होण्याचा अंदाज आहे.
पोलिसांचा बंदोबस्त असणार...
औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य शासनाने घेतला आहे. दरम्यान या निर्णयाविरोधात आक्षेप आणि हरकती दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे नामांतराच्या विरोधात आणि समर्थनार्थ आज लाखो अर्ज विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल केले जाणार आहे. यासाठी विभागीय कार्यालयात गर्दी होण्याची शक्यता आहे. तर दोन्ही बाजूचे समर्थक एकाच ठिकाणी एकत्र येणार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून, विभागीय आयुक्त कार्यालयात पोलिसांचा बंदोबस्त मागवण्यात आला आहे.
विशेष कर्मचारी नियुक्त...
छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधात आणि समर्थनार्थ आज मोठ्याप्रमाणावर अर्ज दाखल होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने देखील याची दखल घेतली आहे. त्यामुळे अर्ज स्वीकारण्यासाठी आज विभागीय आयुक्त कार्यालयात25 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येणाऱ्या अर्जासोबत त्याला ओसी देखील द्यावी लागत असल्याने वेळ जात आहे. त्यामुळे आज येणाऱ्या अर्जांची संख्या लक्षात घेता 25 कर्मचाऱ्यांची आवक-जावक विभागात नियुक्ती करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
मंत्री संदिपान भुमरेंच्या विरोधात बातमी; शिंदे गटाकडून 'सामना'ची होळी