छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीतील नेते दत्ता गोर्डे (Datta Gorde) यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. आज दुपारी मातोश्रीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात त्यांचा जाहीर प्रवेश झाला आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला असून, पैठण तालुक्यातील अजित पवार गटाचे शेकडो कार्यकर्ते यावेळी ठाकरे गटात सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे दत्ता गोर्डे पैठण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने 2019 साली दुसऱ्या क्रमांकावर असलेले उमेदवार ठरले होते. 


पैठण तालुक्यातील आक्रमक कार्यकर्ते म्हणुन ओळख असलेले दत्ता गोर्डे यांनी आज अजित पवारांची साथ सोडून ठाकरे गटात प्रवेश केला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेले दत्ता गोर्डे पूर्वी शिवसेनेतच होते. त्यामुळे, आता पुन्हा ते स्वगृही परत आले असून,  शिवबंधन हाती बांधले आहे. सोबतच ठाकरे गटाकडून ते आगामी विधानसभा निवडणुक लढणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या प्रवेश सोहळ्याच्या वेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील उपस्थित होते. 


कधीकाळी भुमरेंचे विश्वासू...


दत्ता गोर्डे हे मूळचे शिवसेनेचे कार्यकर्ते. तसेच शिंदे गटाचे मंत्री तथा पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदिपान भुमरे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. भुमरे यांनी त्यांना पैठण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष केले होते. मात्र, पुढे दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली आणि गोर्डे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर ते काही काळ भाजपमध्ये राहिले. पुढे त्यांनी 2019 साली राष्ट्रवादीच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक ही लढवली. 13 हजारच्या मताधिक्याने त्यांचा पराभव झाला. परंतु यावेळी ते 69 हजार 924 मतदान घेऊन ते दुसर्‍या क्रमांकाचे उमदेवार ठरले. मात्र, अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने हा मतदारसंघ शिंदे गटाकडे जाणार असल्याचे लक्षात येताच गोर्डे यांनी आता ठाकरे गटात प्रवेश केला आहे.  


गोर्डे यांचा राजकीय प्रवास...


गोर्डे यांनी मागील पंधरा वर्षांत नगरसेवक, उपनगराध्यक्ष आणि नगराध्यक्षपर्यंतचा राजकीय प्रवास केला आहे. मध्यंतरी ते भाजपमध्येही होते. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर ते काही दिवस अजित पवार यांच्या गटातही होते. ते आक्रमक आणि जनतेच्या संपर्कातील कार्यकर्ते आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत पैठण विधानसभा मतदारसंघातून त्यांना ठाकरे गट उमेदवारी देऊ शकतो अशीही चर्चा आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Uddhav Thackeray : 'भगवं वादळ' दिल्लीच्या तक्तावर आदळणार, महाराष्ट्रचं देशाची दिशा ठरवणार; उद्धव ठाकरेंची 'सिंहगर्जना'