चंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कंपार्टमेन्ट क्रमांक 82 मध्ये वाघाच्या मृतदेहाचे अवशेष आढळले आहेत, त्यामुळे जगप्रसिद्ध माया वाघिणीच्या नैसर्गिक मृत्यूची (Tadoba Maya Tigress Death) शक्यता बळावली आहे. जवळपास 100 मीटर परिसरात हे अवशेष विखुरलेले असून या वाघिणीचा मृत्यू अंदाजे दोन महिने आधी झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.


गेल्या तीन दिवसांपासून ताडोबा प्रशासनाने माया वाघिणीच्या शोधासाठी विशेष मोहीम सुरू केली होती. याच मोहिमेअंतर्गत शनिवारी एक सांगाडा सापडला आहे. पण त्यावरून वाघाची ओळख पटवणे शक्य नसल्याने DNA वरून मायाची ओळख पटवण्यासाठी शरीराचे नमुने बंगलोर येथील CCMB (centre for cellular and molecular biology) येथे रवाना करण्यात आले आहेत.


माया वाघिणीचे वय सध्या 13 वर्ष आहे. संबंधित ठिकाणी फक्त सांगाडा सापडला आहे, त्या ठिकाणी कोणताच मानवी हस्तक्षेप नसल्याने मायाचा नैसर्गिक मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र DNA matching नंतर हा मृतदेह मायाचा आहे की नाही यावर शिक्कामोर्तब होणार आहे. अंदाजे 30 नोव्हेंबर पर्यंत DNA रिपोर्ट येण्याची शक्यता आहे. 


ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील माया ही वाघीण जगप्रसिद्ध असून तिचे जगभरात लाखो चाहते आहेत. Queen of tadoba असलेल्या माया चे social sites वर लाखो फोटो आणि व्हिडीओ आहेत. 2010 मध्ये लीला आणि हिलटॉप या जोडीपासून माया चा जन्म झाला होता. 


माया ऑगस्टपासून गायब


माया ही वाघीण ऑगस्ट महिन्यापासून गायब आहे. माया वाघिणीचा माग काढण्यासाठी सध्या 125 कॅमेरा ट्रॅप लावण्यात आलेले आहे. माया वाघीण शेवटची 25 ऑगस्टला पंचधारा या लोकेशनवर मजुरांना दिसली होती. त्यावेळी ती प्रेग्नंट असल्याचं वाटत होतं, त्यामुळे तिच्या जवळ छोटे बच्चे असल्याने ती बाहेर येत नसावी अशी एक शक्यता वर्तवण्यात आली होती. मायाच्या टेरेटरी मध्ये छोटी तारा आणि रोमा या दोन वाघिणी पण दिसत होत्या. त्यामुळे मायाने आपला परिसर बदल्याची  देखील शक्यता वर्तवण्यात आली होती. 


माया सध्या 13 वर्षांची आहे आणि या वयात वाघाचा नैसर्गिक मृत्यू होणे स्वाभाविक असल्याने वनविभाग यादृष्टीने पण शक्यता तपासत आहे. माया या वाघिणीची टी-12 नावाने वनविभागाच्या दफ्तरीत नोंद आहे. अंधारी व्याघ्रप्रकल्पातील सेलिब्रिटी वाघीण अशी ओळख 'माया'ची आहे. पर्यटकांना ती कधी एकटी कधी इतर वाघांसह तर कधी पिल्लांबरोबर दिसून येते. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघांना बघण्यासाठी देश विदेशातील पर्यटक येत असतात. 


ही बातमी वाचा: