चंद्रपूर : चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात कठडे नसल्यामुळे पुलावरुन दुचाकी खाली कोसळल्याने एका तीन महिन्यांच्या गर्भवती महिलेचा (Pregnant Women) दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बल्लारपूर शहराजवळील वर्धा नदीच्या पुलावरील ही घटना घडली. दरम्यान यामध्ये 29 वर्षीय मयत महिलेचं नाव आहे. सुदैवान त्यांच्या सोबत असलेल्या चार वर्षांचा मुलगा हा या अपघातामध्ये बचावला. सध्या या घटनेमुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केला जात आहे. 


रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अनेकदा आवाज उठवला जातो. यामध्ये अनेक जीवांचं आयुष्य देखील संपल्याचं पाहायला मिळालं. परंतु तरीही रस्त्यांची अशी अवस्था काही केल्या सुधारत नसल्याचं चित्र सध्या राज्यात आले. त्याचाच उदाहरण म्हणून या गर्भवती महिलेने आणि तिच्या पोटात असलेल्या चिमुकल्या जीवाने देखील आपलं आयुष्य गमावलं. 


नेमकं काय घडलं?


 बल्लारपूर शहरातील बामनी येथे वास्तव्यास असलेल्या पुष्पा काकडे या आपल्या मुलाला चॉकलेट घेऊन देण्यासाठी स्कुटीने घराबाहेर पडल्या. पण त्या परत न आल्याने त्यांच्या घरच्यांनी एकच शोधाशोध सुरु केली. त्यानंतर त्यांच्या घरच्यांनी पोलीस स्थानकात देखील तक्रार नोंदवली. शोधाशोध सुरु झाल्यानंतर पहाटे वर्धा नदीच्या पुलाखाली मुलाच्या रडण्याचा आवाज आला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यावेळी पुष्पा या मृतावस्थेत सापडल्या. घटनास्थळी पोलिसांना पुष्पा आणि त्यांना कवटाळून बसलेला चार वर्षांचा मुलगा सापडला. या संपूर्ण घटनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दु:खासह संताप देखील व्यक्त केला जात आहे. 


पुलावरुन अनेक अपघात 


दरम्यान या पुलावरुन आतापर्यंत अनेक अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. बल्लारपूर येथे असलेल्या या पुलाला कठडाच नाही. त्यामुळे अनेक अपघातांचं सत्र या पुलावर सुरु असतं.  त्यासाठी अनेकदा प्रशासनाकडे पाठपुरावा देखील करण्यात आला. परंतु तरीही या पुलाच्या दुरुस्तीचे काम होत नसल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यातच आता यामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे पुन्हा एकदा या पुलाच्या प्रश्नावरुन गावकरी संतप्त झाल्याचं म्हटलं जात आहे. 


दरम्यान याबाबत आता तरी स्थानिक प्रशासनाला जाग येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या प्रकरणात आता स्थानिक प्रशासन कोणती कारवाई करणार हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे. 


हेही वाचा : 


Buldhana : रुग्ण तपासणीसाठी डॉक्टरांना घरी बोलावले, नग्न केलं अन् साडे आठ लाखांची खंडणी वसूल केली; चार भामट्यांना अटक