बुलढाणा: शहरातील एका प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञाला रुग्ण तपासणीसाठी घरी बोलावले, त्याला शस्त्राच्या धाकावर नग्न केलं, त्याचं चित्रीकरण करुन ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्या डॉक्टरांकडून साडे आठ लाख रुपयांची खंडणी (Extortion) वसूल केल्याची घटना बुलढाण्यामध्ये घडली आहे. हे कृत्य करणाऱ्या सहा आरोपींविरुद्ध बुलढाणा शहर पोलिसात गुन्हे (Buldhana Crime) दाखल करण्यात आले असून आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे.
रुग्ण तपासण्याच्या बहाण्याने घरी बोलावले
बुलढाणा शहरातील चिखली मार्गावरील डॉ. सौरभ संचेती यांचं रुग्णालय आहे. 12 ऑक्टोबर रोजी ते नियमित रुग्ण तपासणी करत असताना त्यांच्या मोबाईलवर त्यांना एक कॉल आला. मी दीक्षांत नवघरे बोलत असून माझ्या घरात एक कर्करोगाचा रुग्ण असून तुम्ही रुग्ण तपासणीसाठी घरी येऊ शकता का? अशी विनंती डॉक्टरांकडे करण्यात आली. समोरील व्यक्ती दीक्षांत याने डॉक्टरांच्या परिचयाचे असलेल्या व्यक्तींची ओळख सांगितल्याने डॉ. सौरभ यांनी लगेच येतो म्हणून सांगितलं.
शस्त्राचा धाक दाखवत धमकावले
त्यानंतर डॉ. सौरभ हे आपल्या ॲक्टिव्हाने खामगाव मार्गावरील पत्त्यावर गेले असता त्या ठिकाणी सहाही आरोपी त्या घरात बसलेले होते. डॉक्टरांना आत घेऊन गेल्यावर आरोपींनी त्यांना मारहाण करून शस्त्राच्या धमकावत नग्न केले आणि त्यांचे अश्लील चित्रीकरण केले. त्यानंतर समाज माध्यमात हे चित्रीकरण आम्ही व्हायरल करण्याची धमकी देत 20 लाखांची खंडणी मागितली.
आणखी खंडणीची मागणी केले आणि पोलिसांच्या तावडीत सापडले
डॉक्टरांनी आपल्या मित्राला फोन करून साडे आठ लाख रुपये तात्काळ मागवले आणि त्या आरोपींना दिले. मात्र 18 ऑक्टोबर रोजी पुन्हा एक आरोपी त्यांच्या रुग्णालयात आला आणि उर्वरित रक्कम मागू लागला. यावेळी मात्र डॉक्टरांनी पोलिसात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका आरोपीला बुलढाणा शहरातून तर तीन आरोपींना संभाजीनगर जिल्ह्यातून अटक केली आहे. आज न्यायालयात या आरोपींना हजर करण्यात येणार आहे.
ही बातमी वाचा: