चंद्रपूर: 'कुंपणच शेत खातं' ही म्हण सर्वांना परिचित आहे, मात्र याची प्रचिती चंद्रपुरात (Chandrapur News) आली आहे . त्याचं कारण म्हणजे नागरिकांचं चोरट्यांपासून संरक्षण करणाऱ्या पोलिसानेच घरफोडी केल्याचे  समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी  घरफोडीचा आरोपी निघाला आहे. चंद्रपूर पोलीस दलात हा धक्कादायक प्रकार  घडला आहे.  नरेश डाहुले असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर चंद्रपूर पोलिसात मोठी  (Chandrapur City Crime )  खळबळ उडाली आहे


चंद्रपूर पोलिसांच्या( Chandrapur Police) स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेला एक वर्दीतील पोलिसचं घरफोडीचा ( Theft ) आरोपी असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे साऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. . नरेश डाहुलेकडून 6,900 रुपयांची रोकड आणि चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेला रॉड जप्त केला आहे. या प्रकरणात आरोपीने दोन ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली असून चंद्रपूर पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


 चक्क वर्दीतील पोलिसांनीच केल्या दोन घरफोडी


देशात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस व्यवस्था असते. म्हणजेच सर्वसामान्य नागरिकांना  पोलिसांकडून (Police)  न्याय आणि सत्याची अपेक्षा असते. मात्र वर्दीतील पोलीसानेच चोरी केल्याचा प्रकार चंद्रपुरात उघडकीस आला आहे. ज्यामध्ये पोलीसच चोर निघाल्याचं पहायला मिळतंय.चंद्रपूर शहरातील सहकार नगर भागात काही दिवसांपूर्वी 4 हजारांची तर सप्टेंबर महिन्यात उपगणलावार ले-आऊट मध्ये 80 हजारांची घरफोडी झाली होती. या प्रकरणी रामनगर पोलिसांच्या तपासात या दोन्ही घरफोडी नरेश डाहुले यानेच केल्याचं निष्पन्न झालं.


डोक्यावर कर्जाचा डोंगर म्हणून केली चोरी 


पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार ऑनलाइन शेअर ट्रेडिंगच्या व्यसनामुळे आरोपी पोलीस कर्मचाऱ्यावर 22 लाखांचं कर्ज झालं होतं.  त्यातून त्याने हे कृत्य केल्याची माहिती प्राथमिक तपासात उघड झाली आहे. रामनगर पोलिसांनी या प्रकरणात अतिशय शिताफीने तपास करत आरोपीला गजाआड केले. मात्र नरेश डाहुलेच्या अटकेमुळे चंद्रपूर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.


हे ही वाचा :