नागपूर : सोयाबीन (Soybean) खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून सिंगापूर (Singapore ) येथील एका व्यापाऱ्याची तब्बल दिड कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक केली आहे. नागपूरच्या ( Nagpur Crime ) सुभाष रोड, कॉटन मार्केट येथील सैगेरीस इम्पैसा कंपनीने 210 मॅट्रिक टन सोयाबीन खरेदी बाबतचा करार सिंगापूर येथील व्यापारी दुर्गेशकुमार श्रीगोपाल नागोरी यांच्याशी केला होता. मात्र यामध्ये व्यापारी दुर्गेशकुमार यांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी या प्रकरणात संबंधित कंपनी विरोधात गुन्हा दाखल केलाय. ही घटना गणेशपेठ पोलीस स्थानकाअंतर्गत घडली. या प्रकरणात दोन आरोपींविरुद्ध पोलिसांनी कलम 420, ३४ भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध घेत पुढील तपास सुरू केला आहे.
तब्ब्ल दीड कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक
या प्रकरणातील 53 वर्षीय फिर्यादी दुर्गेशकुमार श्रीगोपाल नागोरी यांनी सिंगापूर येथील 22, क्यूक्लोज निट 12/157, येथून नागपूरातील सुभाष रोड, कॉटन मार्केट येथे स्थित असलेल्या सैगेरीस इम्पैसा कंपनी सोबत 210 मॅट्रिक टन सोयाबीन खरेदी बाबतचा करार केला होता. या करारानुसार फिर्यादी दुर्गेशकुमार यांनी कार्गोने मुंबई येथे माल पाठविला. ठरल्या प्रमाणे प्रक्रिया पूर्ण केली. यानंतर आरोपींनी फेब्रुवरी 2022 मध्ये संपूर्ण सोयाबीनचा माल आपल्या ताब्यात घेऊन त्याची कुपवाडा , सांगली एमआयडीसी येथील राधेकृष्ण एक्सट्रक्सन प्राय. लिमी यांना विकले. या व्यापारात 210 मॅट्रीक टन सोयाबीनची किंमत भारतीय चलनात 1 करोड 56 लाख 82 हजार 885 रुपये इतकी होती. आरोपींनी करारा प्रमाणे माल विक्री केल्यानंतर फिर्यादीला मालाची रक्कम देणे अपेक्षीत होते. मात्र तसे न झाल्याने फिर्यादी दुर्गेशकुमार श्रीगोपाल नागोरी यांची फसवणूक झ्याल्याचे निदर्शनास आले.
फसवणुकीत महिलेचाही सहभाग
सदर प्रकरणी गणेशपेठ पोलीस ठाणे हद्दीतील सुभाष रोड, कॉटन मार्केट येथील रहिवासी असलेल्या 38 वर्षीय आरोपी सुजाता मालेवार आणि साईकुमार जयकांत जयस्वाल या दोन आरोपी विरुद्ध कलम 420, 34 भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध घेत पुढील तपास सुरू केलाय.