चंद्रपूर : गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाण्यासह नाशिक, पुणे, नागपूर, जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर अशा विविध जिल्ह्यांमध्ये 'मुलांना पळवणारी टोळी' सक्रिय असल्याचे संदेश व्हॉट्सअपवर व्हायरल होत आहेत. मात्र चंद्रपुरात एका 13 वर्षाच्या शाळकरी विद्यार्थ्यांने मोबाईलवर गेम खेळण्यासाठी शाळेत जायचे नाही म्हणून स्वतःचा अपहरण झाल्याचा बनाव रचला. यामुळे चंद्रपूर पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. नंतर हा  बनाव त्या मुलानेच केला असल्याचे कबुल केले.


चंद्रपूर शहरातील गजबजलेल्या विठ्ठल मंदिर वॉर्ड परिसरात एक शाळकरी मुलगा एका घराशेजारी निपचित पडला होता.  अचानक नागरिकांचे त्यांच्याकडे लक्ष गेलं मुलाला काय झालं म्हणून नागरिक गोळा झाले. त्यानंतर मुलाला शुद्धीत आणलं आणि त्याने अपहरण झाल्याचे सांगितलं ते ऐकून सर्वांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यानंतर घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.  


पोलिसांनी तातडीने मुलाचं अपहरण झालं तो मार्ग आणि त्या मार्गावरील सर्व CCTV कॅमेरे तपासले. अपहरण झालेल्या परिसरामध्ये नागरिकांची चौकशी केली. मुलाने सांगितल्याप्रमाणे अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या मोटरसायकलचा देखील शोध घेतला.  मात्र अपहरणाचे काहीच पुरावे सापडले नाही. मुख्य म्हणजे अपहरण झालेला मुलगा वारंवार आपल्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याचं ठामपणे सांगत होता.


तब्बल तीन तासांच्या तपासानंतर त्या मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न झालाच नाही या निष्कर्षापर्यंत पोलीस येऊन पोहचले. शेवटी मुलाला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता  बनाव रचल्याचे मान्य केले.  शाळेची वेळ होऊनही मुलगा मोबाईलच बघत असल्याचे वडिलांनी त्याच्याकडून मोबाईल हिसकावून घेत त्याला शाळेत जाण्यास सांगितले. मात्र, मुलाला शाळेत जायचेच नसल्याने त्याने स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचला. या प्रकारामुळे पोलिसांसह कुटुंबीयही चक्रावून गेले.


शेवटी मुलाला समज देऊन पोलिसांनी या अपहरण नाट्यावर पडदा टाकला. मात्र यामुळे पुन्हा एकदा मोबाईल जितका गरजेचा तितकाच धोकादायक असल्याचं देखील अधोरेखित झालं.  . मात्र त्या नंतर पोलिसांनी या मुलाला पुन्हा असे करू नये असे समजावून त्याला पालकांच्या हवाली केले. 


संबंधित बातम्या :


Nashik Rumors : नाशिकमध्ये लहान मुलांच्या अपहरणाचा 'फेक मॅसेज', पोलिसांकडून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन