Nashik Rumors : गेल्या काही दिवसांपासून लहान मुलांच्या अपहरणाच्या (Kidnapping) अफवांनी महाराष्ट्रात (Maharashtra) अनेक घटना घडल्या. आता राज्यात बालक चोर टोळीच्या नावाने पसरलेली अफवा नाशिकमध्ये (Nashik) पोहोचली आहे. त्यामुळे नाशिकच्या पालकांमध्ये दहशत असून पालकांची कशी झोप उडाली आहे. मात्र ही अफवा असल्याचे पोलिसांचे म्हणणे असून याबाबत अद्याप कोणताही तक्रार दाखल नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे तसेच अशा पद्धतीचे फेक मॅसेज 9Fake Massage) शेअर करणार्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील पोलिसांनी दिला आहे. 


दरम्यान काही दिवसांपासून राज्यात बालक चोर समजून साधू महाराजांना तसेच नागरिकांना मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली होती. तत्पूर्वी 2020 मध्ये पालघर (Palghar) येथे लहान मुल चोरणारी टोळी समजून साधूंना मारहाणीची घटना घडली होती. तर काही दिवसांपूर्वी सांगली येथे उत्तर प्रदेशातील साधू महाराजांना लहान मुले पळविणारे समजून जमावाने मारहाण केली होती. त्याच सुमारास नाशिकमध्ये देखील फेरीवाल्याला मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर आता दोन दिवसांपासून लहान मुलांचे अपहरण झाल्याचे मेसेज सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये पालकांची धांदल उडाली आहे. 


नाशिक शहरातील अडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील कोणार्क नगर येथून लहान मुलांचे अपहरण झाल्याचा अफवेचा मॅसेज फिरतो आहे. गेल्या दोन दिवसांपासून असे मॅसेजेस सोशल मिडीयात व्हायरल होत असून पोलिसांच्या तपासात ही अफवा असल्याचं समोर आले आहे. पोलिसही यामुळे वैतागले आहेत. एकीकडे देशाचे सायबर पोलीस मुले चोरीच्या नावाखाली लोकांमध्ये कोण भीती पसरवत आहे, याचा तपास करत असताना आता लहान मुलांच्या अपहरणाच्या मॅसेजेसचे लोन नाशिकपर्यंत पोहचले आहे. गेल्या दोन दिवसांपासून ही अफवा नाशिक जिल्ह्यात पसरत असून पालक आपली सर्व कामे सोडून स्वतःहून मुलांकडे लक्ष देत आहेत. 


काय म्हटलंय मॅसेजमध्ये ?
नाशिकमध्ये अशा प्रकारचा मॅसेज व्हायरल झाला असून त्यात म्हटले आहे की शहरातील पाच मुलींसह एका मुलाचे अपहरण झाले आहे, काही बनावट फोटो आणि मेसेज चुकीच्या पद्धतीने पाठवले जात आहेत, अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. आपल्या कुटुंबातील अल्पवयीन मुला-मुलींना कुठेही एकटे सोडू नये. तसेच योग्य ती काळजी घ्यावी शंका असल्यास पोलिसांची संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच खोटे मॅसेज व आणि अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा नाशिक पोलिसांनी दिला आहे.


पोलिसांनी काय सांगितलंय?
अशा पद्धतीची कुठलीही तक्रार अद्याप पोलिसांकडे प्राप्त झालेली नाही. अनेकदा बनावट पोस्ट टाकण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. या सर्व अफवा रोखण्याकरिता सोशल मीडियावर पोलीस यंत्रणांनी लक्ष केंद्रित केले आहे. कोणत्याही पोस्टची खात्री केल्याशिवाय ती माहिती पुढे पाठवू नका. अफवा पसरविणे हा कायद्याने गुन्हा असल्याने तसे केल्यास सायबर ऍक्ट प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात येतील, असे पोलीस प्रशासनाने सांगितले.