बुलढाणा : जिल्ह्यातील शेगाव आणि नांदुरा तालुक्यातील लोकांची झालेली केस गळती ही वातावरणातील एखाद्या विषारी घटकामुळे झाली असल्याची शक्यता ICMR च्या पथकाने व्यक्त केली. केस गळतीसंबंधी 50 रुग्णांचा अभ्यास करून, 250 सँपल घेऊन ICMR चं पथक रवाना झालं आहे. विविध प्रयोगशाळेत तपासण्या करून एक महिन्यात या केस गळतीच्या कारणांचा शोध लागेल अशी माहिती आहे.


बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव आणि नांदुरा तालुक्यातील अनेक गावात अचानक केस गळती सुरू झाली आणि त्यानंतर टक्कल पडण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत जवळपास 188 रुग्ण या आजाराने बाधित आढळले. गेले 20 दिवस यंत्रणेने प्रयत्न करूनही अद्याप ठोस असा केस गळतीच्या कारणांचा शोध लागला नाही. त्यामुळे देशाची सर्वोच्च असलेली भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) शास्त्रज्ञांच्या आठ जणांच्या पथकांनी गेल्या चार दिवस या भागात राहून संपूर्ण रुग्णांचा अभ्यास केला. 


एकूण 250 प्रकारचे सँपल्स घेतले


एकूण 50 रुग्णांचा अभ्यास केल्यानंतर 250 प्रकारचे संपल्स घेऊन संशोधकांचे हे पथक रवाना झालं. या संशोधकांनी शेगाव तालुक्यातील अनेक गावांना भेट देऊन रुग्णांचा अभ्यास केला. 


गेले चार दिवस शेगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन या पथकाने 50 रुग्णांच्या सखोल तपासण्या केल्या . या परिसरात गुरुवारी या पथकाचा शेवटचा दिवस होता. अनेक रुग्णांच्या तपासण्या केल्यानंतर या पथकातील ज्येष्ठ सदस्यांनी आणि पथक प्रमुखांनी एबीपी माझाशी संवाद साधला. 


वातावरणातील कुठल्या तरी विषारी घटकामुळे ही केस गळती होत असल्याचा प्राथमिक अंदाज या पथकाने लावला आहे. मात्र अंतिम निदान हे देशातील विविध प्रयोगशाळेत या सॅम्पलचा अभ्यास केल्यानंतर होईल अशी माहिती या पथकाने दिली आहे.  


अचानक केस गळतीमुळे गावकरी हैराण


जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जवळपास 15 ते 16 गावांमधील लोकांच्या केस गळतीला अचानक सुरुवात झाली. दोन ते तीन दिवसात केस गळती होऊन पूर्ण टक्कल पडण्याचं प्रमाण वाढलं. संपूर्ण घटनाक्रमाला आता जवळपास तीन आठवडे उलटून गेले. दररोज रुग्ण संख्या वाढत आहे. जिल्हास्तरावरून आणि राज्यस्तरावरून याचे निदान करण्याच्या प्रयत्न झाल्यानंतर केंद्राची सर्वोच्च असलेली केंद्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या पथकाला या ठिकाणी या केस गळतीच निदान करण्यासाठी पाचारण कराव लागले. आयसीएमआरचं आठ जणांचं पथक या परिसरात पोहोचलं आणि त्यांनी रुग्णांची तपासणी सुरू केली.


आयसीएमआरच्या पथकाने आता या ठिकाणचे सँपल्स गोळा केले आहेत आणि त्यावर विविध प्रयोगशाळांत अभ्यास करण्यात येणार आहे. 


ही बातमी वाचा: