बुलढाणा : जिल्ह्यातील काही गावातील लोकांना अचानकपण टक्कल पडायला सुरुवात होऊन आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्यानंतर त्याचे आता सामाजिक परिणामही समोर येत आहेत. या गावांतील लग्नाळू मुला-मुलींचे लग्न जुळेनात, या गावांत पाहुणाही येत नाही. तसेच या गावात आता बाहेरून येणारा भाजीपाला आणि दूधाचा पुरवठा बंद झाला आहे. इतकंच काय तर या गावांतील लोकांना इतर गावांमध्ये प्रवेश दिला जात नाही, त्या गावातील सलूनमध्येही प्रवेश दिला जात नसल्याचं समोर आलं आहे.
जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जवळपास 15 ते 16 गावात अचानक केस गळती सुरू झाली आणि अनेकांना टक्कल पडलं. एबीपी माझाने सर्वात आधी ही बातमी जगासमोर आणली आणि सुरू झाली आरोग्य यंत्रणेची धावाधाव. अनेक वैद्यकीय पथके या भागात केस गळतीचा शोध घेण्यासाठी येऊन गेली. मात्र वीस दिवस उलटूनही केस गळतीच्या कारणांचा अद्याप शोध लागलेला नाही.
या परिसरात देशाच्या सर्वोच्च असलेल्या केंद्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे पथक पोहोचले आहे. मात्र गेल्या वीस दिवसापासून शेगाव तालुक्यातील या 15 ते 16 गावातील नागरिकांना अनेक परिणामांना सामोरे जाव लागत आहे. या गावातील व या परिसरातील नागरिकांकडे इतर परिसरातील लोक वेगळ्याच नजरेने बघायला लागले आहेत.
लग्नाळू मुला-मुलींचे विवाह थांबले
केस गळती आणि टक्कल पडत असल्याने या परिसरात कुणी नवीन पाहुणाही येत नसल्याचं दिसून आलं. तर इतर गावातही या परिसरातील कुणाला येऊ देत नाहीत. या गावातील लग्नाळू मुलांना-मुलींना स्थळही येईना असं चित्र आहे. तर लग्न ठरलेले असूनही पाहुणे सुद्धा काही कारणाने या गावात यायचं रद्द करायला लागले आहेत.
गावातील लोकांना सलूनमध्ये बंदी
या परिसरातील नागरिकांना सलूनमध्ये सुद्धा प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. शासनाने लवकरात लवकर या आजाराचे निदान करून यावर तात्काळ औषध उपचार करावा आणि या परिस्थितीतून बाहेर काढावं अशी मागणी या परिसरातील नागरिक आता करत आहेत.
बुलढाण्यात ICMR चं पथक दाखल
बुलढाण्याच्या शेगावातील केस गळती आणि टक्कल पडण्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी ICMR चं पथक दाखल झालं आहे. या पथकामध्ये आठ जणांचा समावेश आहे. दिल्ली, चेन्नई, भोपाळ येथील ICMR च्या डॉक्टरांचा यामध्ये समावेश आहे. या आयुष पथकाने दोन दिवस या भागातील आठ गावांचा दौरा केला. परंतु अजूनही केस गळतीचं निदान करता आलेलं नाही.
ही बातमी वाचा: