बुलढाणा: काम करताना ठेकेदाराकडून कधी मालपाणी घेतलं नाही, लक्ष्मीदर्शन घेतलं नाही, कामाच्या दर्जावरुन अनेक ठेकेदारांनी माझ्या शिव्या खाल्या आहेत, तर एक दोन वेळा तर त्यांना मारण्याचीही वेळ आली असं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितलं. एखाद्या रस्त्याचं काम ज्यावेळी चांगलं होतं, लोकप्रतिनिधी ज्यावेळी त्याचं कौतुक करतात त्यावेळी मला आनंद होतो असं नितीन गडकरी म्हणाले. खामगाव येथील महामार्गाचे लोकार्पण आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. 


नितीन गडकरी म्हणाले की, आपले आमदार-खासदार आणि इथले लोक मला सांगतात की रस्ता चांगला बांधला आहे, तेव्हा मला अतिशय आनंद होतो. याचं कारण क्वालिटीच्या बाबतीत हे रस्ते चांगले आहेत. या रस्त्यांची मालकी ही आमची नाह. आम्ही आमदार-खासदार आहोत, सेवक आहोत. पण या रस्त्यांची खरी मालकी ही या देशातील जनता आहे. म्हणून आम्ही ठेकेदाराकडून मालपाणी नाही खाल्लं, लक्ष्मी दर्शन नाही घेतलं, कवडीचा चहा नाही पिलो. एखादा ठेकेदाराने काम चांगलं नाही केला तर त्याला रडवल्याशिवाय राहणार नाही आणि हे मी नेहमी सांगत असतो. कामावरुन अनेक ठेकेदारांनी माझ्या शिव्या खाल्या आहेत. एक दोन ठेकेदारांना तर मारण्यापर्यंत वेळ आली होती. खराब काम केलं तर मी नेहमी म्हणतो की ही जनतेशी बेईमानी आहे. म्हणून आज या कामात चांगली क्वालिटी असल्याचं सांगितलं जातं तेव्हा मला आनंद होतो."


आज खामगाव येथे अमरावती-चिखली राष्ट्रीय महामार्ग 53 वरील 816 कोटींच्या शेळद ते नांदुरा प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आलं. हा महामार्ग महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, (खामगाव) बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांना जोडणारा महामार्ग आहे. तसेच रायपूर-नागपूर-सूरत या पूर्व-पश्चिम कॉरिडॉरसाठी उत्तम कनेक्टिव्हिटी म्हणून देखील हा महामार्ग महत्त्वपूर्ण आहे. या महामार्गावर केंद्र सरकारच्या अमृत सरोवर योजनेअंतर्गत महामार्ग प्रकल्पालगत असलेल्या तलावांचे खोलीकरण करुन जलकुंभाची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे खामगावसारख्या उष्ण आणि सखल भागातील पाणी टंचाईची समस्या दूर करण्यात मदत होणार आहे.


शेळद ते नांदुरादरम्यान करण्यात आलेल्या या प्रकल्पाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. विभागाच्या चौपदरीकरण प्रकल्पाची एकूण लांबी 45 किमी आहे. तसेच याअंतर्गत 14 किमीचा ग्रीनफील्ड बायपास, 4 प्रमुख पूल, 16 छोटे पूल, 63 कल्व्हर्ट, 1 आरओबी, 8 वाहन अंडरपास, 2 पादचारी अंडरपास, 12 बस शेल्टर यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील प्रसिद्ध चांदीच्या बाजारपेठेसाठी हा प्रकल्प उपयोगी ठरणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे. तसेच यामुळे बुलढाणा जिल्ह्यापासून नागपूर जिल्ह्यापर्यंतचा प्रवासाचा वेळ वाचवण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे व्यापाराच्या दृष्टीने देखील हा महामार्ग महत्त्वाचा असल्याचं म्हटलं जात आहे.  


ही बातमी वाचा: