Buldhana News : महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगढ आणि ओडिशा या राज्यांमधील महत्त्वपूर्ण दुवा असणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग (National Highway) 53 वरील महत्तवपूर्ण अशा विकासकामांच्या प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी या महामार्गावरील विकासकामांच्या प्रकल्पांचे लोकार्पण बुलढाणा जिल्ह्यात खामगाव येथे केले. आज खामगाव येथे अमरावती-चिखली राष्ट्रीय महामार्ग 53 वरील 816 कोटींच्या शेळद ते नांदुरा प्रकल्पाचे लोकार्पण केले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार प्रतापराव जाधव, खासदार रक्षा खडसे तसेच अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते. आधुनिक रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्याला विकासाच्या मार्गावर अग्रेसर करण्याचा प्रयत्न सध्या शासनाकडून करण्यात येत आहे.
हा महामार्ग महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, (खामगाव) बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांना जोडणारा महामार्ग आहे. तसेच रायपूर-नागपूर-सूरत या पूर्व-पश्चिम कॉरिडॉरसाठी उत्तम कनेक्टिव्हिटी म्हणून देखील हा महामार्ग महत्त्वपूर्ण आहे. या महामार्गावर केंद्र सरकारच्या अमृत सरोवर योजनेअंतर्गत महामार्ग प्रकल्पालगत असलेल्या तलावांचे खोलीकरण करुन जलकुंभाची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे खामगावसारख्या उष्ण आणि सखल भागातील पाणी टंचाईची समस्या दूर करण्यात मदत होणार आहे.
ही आहेत प्रकल्पाची वैशिष्ट्ये
शेळद ते नांदुरादरम्यान करण्यात आलेल्या या प्रकल्पाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. विभागाच्या चौपदरीकरण प्रकल्पाची एकूण लांबी 45 किमी आहे. तसेच याअंतर्गत 14 किमीचा ग्रीनफील्ड बायपास, 4 प्रमुख पूल, 16 छोटे पूल, 63 कल्व्हर्ट, 1 आरओबी, 8 वाहन अंडरपास, 2 पादचारी अंडरपास, 12 बस शेल्टर यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील प्रसिद्ध चांदीच्या बाजारपेठेसाठी हा प्रकल्प उपयोगी ठरणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे. तसेच यामुळे बुलढाणा जिल्ह्यापासून नागपूर जिल्ह्यापर्यंतचा प्रवासाचा वेळ वाचवण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे व्यापाराच्या दृष्टीने देखील हा महामार्ग महत्त्वाचा असल्याचं म्हटलं जात आहे.
महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे खामगाव शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्याचा प्रयत्न या निमित्ताने करण्यात आला आहे. तसेच अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी देखील आता मदत होणार आहे. या प्रकल्पामुळे शेगाव, लोणार या धार्मिक आणि भौगोलिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण स्थळांना भेट देणे आता सहज शक्य होणार आहे. शेतीमालाची वाहतूक सुलभ होण्यास मदत होईल. या प्रकल्पामुळे पर्यटन, आरोग्य, शिक्षण आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.
अनेक विकासकामांची घोषणा
या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनेक विकासकामांची घोषणा देखील केली आहे. या अंतर्गत 1200 कोटी रुपयांच्या तरतुदींसह मलकापूर-बुलढाणा-चिखली आणि 350 कोटींसह बाळापूर-शेगाव या 22 किमीच्या मार्गाची घोषणा करण्यात आली आहे. तसेच 25 कोटींच्या चिखली ते ठाकरखेड आणि अन्य रस्त्यांच्या कामांस मंजुरी देण्यात आली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
संभाजीनगरमध्ये 51 वटवृक्षांचे रुट बॅाल प्रक्रियेद्वारे पुनर्रोपण; नितीन गडकरी करणार पाहणी