बुलढाणा :  खामगावमधील शासकीय विश्रामगृह दारुड्यांचा अड्डा बनलाय का? असा सवाल उपस्थित झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या या शासकीय विश्रामगृहाबाहेर दारुच्या बाटल्यांचा खच पडल्याचं दिसून आला आहे. विश्रामगृहात येणारे शासकीय अधिकारी आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्तेचं मद्य पार्टी करत असल्याचं बोललं जात आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता अधिकाऱ्यांनी यावर कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला.  इंग्रजांच्या काळापासून ही विश्रामगृह आहेत मात्र आता ही विश्रामगृह शासकीय अधिकाऱ्यांसह राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी मदिरालये बनत चालली आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. 


बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे शासकीय विश्रामगृह खामगाव येथे आहे. आता विश्रामगृह मदिरालय बनत चाललं आहे की काय असा सवाल उपस्थित राहत आहे. कारण विश्रामगृहात आणि  परिसरात  दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच आहे. एखाद्या बारसमोर नसतील इतक्या बाटल्या खामगाव शासकीय विश्रामगृह परिसरात आहेत.  उच्च अधिकारी आसो की राजकीय पक्षांचे पदाधिकारी थांबल्यावर खामगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी त्यांची चांगलीच बडदास्त ठेवताना दिसत आहेत. मात्र यामुळे हे शासकीय विश्रामगृह आहे की मदिरालये असा सवाल आता उपस्थित होत आहे.


 शासकीय विश्रामगृहात लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी आणि पोलीस अधिकारी कामानिमित्त येत असतात. या इमारतीच्या आवारात सर्व सामान्य नागरिकांना प्रवेश घेणे फारच जिकिरीचे असते. प्रवेश मिळालाच तर कोणी बोलवले काय काम आहे? या प्रवेशद्वारावरील पोलिसांच्या प्रश्नांचा सामना करावा लागतो. एवढी सक्षम यंत्रणा असताना या परिसरात दारुच्या बाटल्या कुठून आल्या ? तसेच या बाटलीचे खरे तळीराम कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.  


व्यसनामुळे राज्यात अनेक संसार उद्ध्वस्त होण्याच्या घटना  घडताना दिसतात. असे असताना शासकीय इमारतीतील भोंगळ कारभारामुळे दिव्याखालीच अंधार असल्याचे स्पष्ट होत आहे. या तळीरामांचा शोध घेऊन योग्य कारवाई होईल का? हा मोठा प्रश्नच आहे. या दारूच्या बाटल्या आल्या कुठून आणि ही दारु रिचवणारे नेमके आहेत तरी कोण? याची माहिती कोणालाच नाही.  मात्र हे नित्याचाच प्रकार असून त्याशिवाय चालत नाही अशी असंवेदनशील प्रतिक्रिया एका अधिकाऱ्याने एबीपी माझाला दिली आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :


ना बीअर, ना रम... 'या' दारुची भारतीयांना भुरळ; दरवर्षी कोट्यवधी बॉटल्सचा खप