India People Drink Most Scotch Whisky : दारू (Alcohol) आरोग्यासाठी हानिकारक मानली जाते, पण असे असूनही भारतात दारु (Alcohol Consumption) पिणाऱ्यांची कमी नाही. 'झूम बराबर... झूम' म्हणत दारुच्या नशेत नाचणाऱ्यांची संख्या भारतात मोठी आहे. भारतात दरवर्षी दारु पिणाऱ्या लोकांची आकडेवारी पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. दारु पिण्याचे तोटे माहित असूनही लोकांचा दारु पिण्याचा मोह आणि सवय काही सुटत नाही. दारुचे वेगवेगळे प्रकार आहेत. हे प्रत्येकाच्या आवडीवर अवलंबून आहे. बीयर, रम, व्हिस्की पिणाऱ्यांचं प्रमाण काही कमी नाही. दरम्यान, भारतातील मद्यपींची आवडती दारु कोणती हे तुम्हाला माहित आहे का?


ना बीअर, ना रम... 'या' दारुची भारतीयांना भुरळ


भारतीय मद्यपींना बीअर किंवा रम नाही तर स्कॉच व्हिस्कीने भुरळ घातली आहे. भारतात स्कॉच व्हिस्की पिणाऱ्यांचं प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती अहवालात समोर आली आहे. स्कॉच व्हिस्की पिण्यात भारतीय पहिल्या क्रमांकावर आहेत. इतकंच नाही तर भारतीयांनी याबाबतील जगातील सर्व देशांना मागे टाकलं आहे. भारतात 2022 साली स्कॉच व्हिस्कीच्या किती बाटल्यांचा खप झाला हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.


भारतात स्कॉच व्हिस्कीची खप किती?


2022 मध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, वर्षभरात भारतात स्कॉच व्हिस्कीच्या एकूण 219 दशलक्ष बाटल्यांचा खप झाला. 2021 मध्ये भारतात स्कॉच व्हिस्कीच्या एकूण 136 बाटल्यांचा खप झाला होता. जगभरातून निर्यात होणाऱ्या स्कॉच व्हिस्कीच्या बाबतीत भारत अव्वल आहे.


'या' राज्यांतील लोक सर्वाधिक दारु पितात


उत्पादन शुल्क विभागाच्या अहवालानुसार, सर्वाधिक दारु पिणाऱ्या राज्यांमध्ये छत्तीसगडचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. छत्तीसगडमधील सुमारे 3 कोटी लोकसंख्या आहे. या लोकसंख्येपैकी 35.6 टक्के लोक दारुचं सेवन करतात. यानंतर त्रिपुरा राज्याचं नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्रिपुरातील सुमारे 34.7 टक्के लोक दारुचं सेवन करतात. त्यापैकी 13.7 टक्के लोक नियमितपणे दारुचे सेवन करतात. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या आंध्र प्रदेशमध्ये सुमारे 34.5 टक्के लोक नियमितपणे दारुचे सेवन करतात.


या यादीत पंजाब चौथ्या क्रमांकावर आहे. सुमारे 3 कोटी लोकसंख्या असलेल्या पंजाब राज्यातील 28.5 टक्के लोक दारुचे सेवन करतात. इथे नियमित दारु पिणाऱ्यांची संख्या 6 टक्के आहे. पाचव्या क्रमांकावर समाविष्ट असलेल्या अरुणाचल प्रदेशातील सुमारे 28 टक्के लोक दारुचे सेवन करतात. या यादीत गोवा सहाव्या क्रमांकावर आहे. गोव्यातील सुमारे 26.4 टक्के लोक दारुचं सेवन करतात. NFHS च्या अहवालानुसार, या यादीत केरळचा क्रमांक सातवा आहे. केरळमधील 19.9 टक्के लोक दारूचे सेवन करतात.


पश्चिम बंगाल हे सुमारे 10 कोटी लोकसंख्या असलेले राज्य दारु पिणाऱ्यांच्या या यादीत आठव्या क्रमांकावर आहे. पश्चिम बंगालमधील सुमारे 14 टक्के लोकसंख्या म्हणजेच सुमारे 1.4 कोटी लोक दारु पितात. दारु पिणाऱ्या टॉप 10 यादीमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक नाही. महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. दरम्यान, इकॉनॉमिक रिसर्च एजन्सी (ICRIER) आणि लॉ कन्सल्टिंग फर्म (PLR) चेंबर्सच्या अहवालानुसार, उत्तर प्रदेश राज्यात मद्यपान करणाऱ्यांची संख्या देशात सर्वाधिक आहे, त्यानंतर पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो.