Food Poisoning In Buldhana : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील सोमठाणा गावात मंगळवारी एकादशी निमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमानंतर जेवणातून भगर आणि आमटी सर्व भाविकांना देण्यात आली. मात्र, भगर आणि आमटी जेवल्यानंतर गावातील जवळपास सर्वांनाच उलटी व जुलाबाचा त्रास सुरू झाला. अंदाजे 450 ते 500  जणांना या जेवणातून विषबाधा (Food Poisoning) झाली असून, या सर्वांवर बिबी, लोणार, मेहकर, सिंदखेड राजा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना विषबाधा झाल्याने खळबळ उडाली आहे. 


लोणार तालुक्यातील सोमाठाना गावात एका धार्मिक कार्यक्रमात भगर व आमटी जेवल्यानंतर जवळपास 500 जणांना विषबाधा झाली होती. यासर्व गावकऱ्यांवर विविध ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात व ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. यातील 100 ते 120 जणांची प्रकृती सुधारल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तर अद्यापही 400 जणांवर उपचार सुरू आहेत. यातील काही वृद्ध नागरिकांची प्रकृती गंभीर आहे. रात्री विषबाधेच्या प्रकारानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर्स गैरहजर असल्याने गावकऱ्यांनी जिल्हा आरोग्य प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे. 


आरोग्य केंद्रात डॉक्टर्स गैरहजर 


लोणार तालुक्यातील सोमाठाना गावात 400 ते 500 जणांना विषबाधा झाल्याने एकच खळबळ उडाली. परिसरात असलेल्या सर्वच आरोग्य केंद्रात या रुग्णांना दाखल करण्यात आले. रुग्णालयातील जागा आणि डॉक्टर्स अपूर्ण पडत असल्याने बुलढाणा येथून डॉक्टरांचं पथक बोलवण्यात आले. विशेष म्हणजे रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने अनेकांना जमिनीवरच झोपवून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. धक्कादायक म्हणजे अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर्स गैरहजर असल्याने रुग्णांना वेळेत उपचार मिळू शकले नाही. त्यामुळे काही रुग्णांची प्रकृती गंभीर झाली होती. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये संताप पाहायला मिळाला. तर, अजूनही अनेक रुग्णांवर उपचार सुरूच आहे. 


एकच गोंधळ उडाला...


धार्मिक कार्यक्रमात भगर व आमटी जेवल्यानंतर जवळपास 500 जणांना विषबाधा झाली. अनेकांना उलटी व जुलाबाचा त्रास सुरू झाला. एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात विषबाधा झाल्याने गावात खळबळ उडाली. अनेक महिला रडू लागल्या. काहींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने उपचाराची गरज होती. त्यामुळे मिळेल त्या वाहनातून रुग्णांना रुग्णालयात नेले जात होते. गावात एकच गोंधळ पाहायला मिळत होते. विशेष म्हणजे अनेक वृद्ध व्यक्तींना देखील त्रास होऊ लागल्याने चिंता अधिक वाढली होती. त्यामुळे परिसरात असलेल्या सर्वच रुग्णालयात रुग्णांना दाखल करण्यात आले. सुदैवाने सकाळपर्यंत कोणतेही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Buldhana Crime News : कारची काच फोडून नऊ लाखांची रोकड लंपास; महिन्याभरातील सहावी घटना