बुलढाणा : पोलिसांच्या अत्याचाराच्या अनेक घटना नेहमीच समोर येत असतात. दरम्यान, बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात असाच काही संतापजनक प्रकार समोर आला आहे. पोलीस ठाण्यात बोलावून फिर्यादीलाच अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ज्याच्यावर गुन्हा दाखल आहे त्या आरोपीने फिर्यादीला करण्यात आलेल्या मारहाणीचा व्हिडिओ (Video) तयार करून तो समाज माध्यमात व्हायरल केला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील तामगांव पोलीस ठाण्यातील ही घटना असल्याचे समोर येत आहेत. 


बुलढाणा जिल्ह्यात एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात एक पोलीस कर्मचारी एका व्यक्तीला अमानुष मारहाण करतांना पाहायला मिळत आहे. पोलीस सुंदरीने (ब्लेट) कधी हातावर तर कधी पायावर जोरजोरात ही मारहाण करण्यात येत असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. सुरवातीला हा पोलीस कर्मचारी संबंधित फिर्यादीला हात पुढे करायाला सांगतो. त्यानंतर फिर्यादीच्या ब्लेटने मारहाण करतो. यावेळी आपल्याला त्रास होत असल्याचे सांगून देखील पोलीस कर्मचारी मारहाण थांबवत नाही. त्यानंतर फिर्यादीला खाली बसवून त्याच्या पायाच्या तळपायावर पुन्हा एकदा ब्लेटने मारहाण करण्यात आली. हा पोलीस कर्मचारी थकेपर्यंत मारहाण करतो. विशेष म्हणजे या सर्व मारहाणीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. त्यामुळे आता या पोलीस कर्मचारी विरोधात कोणती कारवाई केली जाणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे. 


काय आहे प्रकरण? 


शेख मतीन शेख मोबीन हा रिक्षा घेऊन बस स्टँडवर रिक्षा घेऊन उभा होते. यावेळी तिथे चार महिला आणि एक पुरुष आले. तसेच आम्हाला पातुर्डा फाटा येथे सोडा असे मतीन यांना म्हणाले. त्यामुळे ते संबंधित लोकांना पातुर्डा फाटाकडे सोडण्यासाठी निघाले होते. याचवेळी शेखर पुंजाजी नपनारायण तिथे आला. तसेच माझ्या नातेवाईकांना घेऊन कसे चालला असे म्हणत मतीन यांना शिवीगाळ आणि चापटबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे मतीन यांच्या फिर्यादीवरून शेखर पुंजाजी नपनारायण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी आरोपीवर कोणतेही कारवाई न करता फिर्यादीलाच पोलीस ठाण्यात बोलावले. तसेच, त्यालाच बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.




कारवाई करण्याची मागणी...


फिर्यादीला मारहाण झाल्यावर त्याने आपल्याला न्याय मिळेल म्हणून पोलिसांत धाव घेऊन गुन्हा दाखल केला. मात्र, उलट पोलीस कर्मचारी याने फिर्यादीलाच पोलीस ठाण्यात बोलावून त्याला मारहाण केली आहे. त्यामुळे आता न्याय कुणाला मागवा असा प्रश्न मारहाण झालेल्या फिर्यादीला पडला आहे. तसेच मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची देखील आता मागणी होतांना पाहायला मिळत आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या : 


Buldhana News : दहावी-बारावीच्या प्रश्नपत्रिका ठेवलेल्या रूममध्ये मद्यधुंद शिक्षकाचा राडा; पंचायत समिती कार्यालयातील प्रकार