Buldhana News : दहावी आणि बारावीच्या प्रश्नपत्रिका ठेवलेल्या कस्टडी रूममध्ये एका मद्यधुंद शिक्षकांने चांगलाच राडा घातला आहे. ही घटना आज 29 फेब्रुवारीला दुपारी संग्रामपूर पंचायत समिती (Sangrampur Panchayat Samiti) मध्ये घडली. महेंद्र रोठे असे या शिक्षकाचे नाव असून या शिक्षकाची नियुक्ती आज वरवट बकाल  (Buldhana News) येथे सुरू असलेल्या कार्यशाळेत केलेली होती. मात्र या शिक्षकाने कार्यशाळेत न जाता पंचायत समितीतील कस्टडी रूममध्ये जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत वाद घालण्यास सुरुवात केली. या सर्व प्रकारामुळे संग्रामपूर पंचायत समिती मध्ये बराच वेळ गोंधळाचे वातावरण बघायला मिळाले. 


मद्यधुंद शिक्षकाचा पंचायत समिती कार्यालयात राडा


सध्या राज्यात होणारे पेपरफूटीच्या घटना आणि विविध परीक्षेतील भोंगळ कारभार सर्वश्रुत आहे. वास्तविकता कस्टडी रूममध्ये अतिशय सुरक्षित असे दहावी आणि बारावीचे प्रश्नपत्रिका संच ठेवलेले असतात. या रूममध्ये काम नेमलेल्या व्यक्तीशिवाय कुणालाही प्रवेश दिला जात नाही. मात्र राज्यभरात प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकार समोर येत असताना कस्टडी रूममध्ये दस्तूरखुद्द शिक्षकानेच आणि तेही  मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालणे हा प्रकार गंभीर आहे. याप्रकरणी संबंधित विभाग काय कारवाई करते हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे. मात्र संग्रामपूर पंचायत समितीमध्ये घडलेल्या या प्रकारमुळे परिसरात बराच वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.  


नारळ खाण्यासाठी अस्वल कंपनीचा थेट मंदिरात प्रवेश


अन्नाच्या शोधात असलेल्या एका अस्वलाच्या कुटुंबाने चक्क महादेव मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला.  त्यानंतर बऱ्याच वेळ मंदिरात ठाण मांडून बसलेल्या या अस्वलाच्या कुटुंबाने मंदिरात ठेवलेले प्रसादाचे नारळ आणि प्रसाद फस्त करून त्याचा मनमुराद आस्वाद घेतला. सुदैवाने त्यावेळी मंदिरात कुणीही नसल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.   


अस्वलांचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद 


बुलढाणा जिल्ह्यातील डोंगरशेवली आणि डोंगर खंडाळा हे गाव ज्ञानगंगा अभयारण्याच्या परिसराला लागूनच आहे. गावात अनेकदा पाणी पिण्यासाठी जंगली श्वापद ये जा करत असतात. मात्र, आता तर  एक अस्वल आणि तिची तीन पिल्ले थेट डोंगर शेवली येथील सोमनाथ महाराज संस्थांच्या मंदिरात चक्क प्रसाद खाण्यासाठी आल्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. काल 28 फेब्रुवारीच्या रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही अस्वल मंदिर परिसरात भटकत होती. मंदिर परिसरात पिण्यासाठी मुबलक पाणी आणि खाण्यासाठी प्रसाद असल्याकारणाने या ठिकाणी ती आली असावी, असा ग्रामस्थांचा अंदाज आहे. परंतु या मंदिरावर भक्तांची बरीच रेलचेल असते. अशा वर्दळीच्या ठिकाणी जंगली प्राणी आणि त्यातही अस्वल आले असल्याने सध्या परिसरात भीतीच वातावरण निर्माण झाल आहे. त्यामुळे वन विभागाने याकडे तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या