Buldhana News: बुलढाणा येथील (Buldhana News) शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्या अडचणीत आणखी वाढ होतांना दिसत आहे. नुकतेच आपण वाघाची शिकार करुन त्याचा वाघनख गळ्यात लॉकेट म्हणून घातल्याचा दावा करणारा एका व्हिडिओमुळे अडचणीत आलेल्या गायकवाड यांच्या विरोधात जमीन बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


एका महिलेची शेतजमीन हडपून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून संजय गायकवाड यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोराखेडी पोलिसांनी (Buldhana Police) मोताळा न्यायालयाच्या आदेशावरून बुधवारी, 28 फेब्रुवारीच्या मध्यरात्री कारवाई करत हा गुन्हा दाखल केला आहे. 


जमीन बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल


नागपूर येथील रीता यमुनाप्रसाद उपाध्याय (42 , रा. नागपूर) यांची मोताळा तालुक्यातील राजूर शिवारातील गट नंबर 62 मध्ये दीड एकर शेती आहे. 2021 च्या कोरोना काळात आमदार संजय गायकवाड आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी संगनमत करून ही शेतजमीन बळजबरीने ताब्यात घेतली. या जागेवर आमदार गायकवाड यांना अलिशान फार्म हाऊस बांधण्यासाठी सुरुवात देखील केली. या शेतजमिनीवर अतिक्रमण करून शेतीची कुंपणेही त्यांनी काढून टाकले. सोबतच आपण देत असलेल्या दरात शेतजमीन आपल्या नावावर करून द्यावी, असा तगादाही गायकवाड यांनी उपाध्याय यांच्याकडे लावला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


याप्रकरणी उपाध्याय यांनी पोलिसांत तक्रार केली होती. मात्र, पोलिसांनी याविषयी फार दखल न घेता कुठलीही कारवाई केली नाही. त्यानंतर उपाध्याय यांनी मोताळा येथील न्यायालयात धाव घेतली असता, आमदार संजय गायकवाड यांच्यासह त्यांचा चिरंजीव मृत्युंजय गायकवाड, सोमनाथ चौबे, दिपाली चौबे आणि ज्ञानेश्वर वाघ यांच्यावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  यात भादवी 156(3), 143, 150, 379, 385, 447 आणि 34 नुसार बोराखेडी पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक सारंग नवलकार यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राजवंत आठवले हे करीत आहेत. 


स्वत: वाघाची शिकार केल्याचा दावा 


आमदार संजय गायकवाड यांनी 19 फेब्रुवारी रोजी आयोजित शिवजयंती कार्यक्रमात आकर्षक पेहराव केला होता. हातात तलवार, डोक्यावर फेटा, गळ्यात मोत्यांच्या माळा असा तो पेहराव होता. त्यावर बुलढाणा येथील एका स्थानिक प्रसारमाध्यमाच्या पत्रकाराने त्यांच्या वेशभूषेसंदर्भात मुलाखत घेतांना प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी गायकावाड यांच्या गळ्यातील लॉकेटबाबत  विचारले असता, ते म्हणाले,  हा दात वाघाचा असून, आपण स्वत: 1987 मध्ये वाघाची शिकार केली होती. तोच दात आपण लॉकेटमध्ये घातले असल्याचे वक्तव्य त्यावेळी त्यांनी केले होते. त्यांचा या व्यक्तव्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर या व्यक्तव्याची दखल घेत वन विभागाने गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली होती. सोबतच संबंधित दातसदृश वस्तू वन विभागाने आपल्या ताब्यात घेतली होती. आता ही कथित स्तरावरील वाघदातसदृश वस्तू डेहराडून येथील वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूटमध्ये डीएनए तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. तेथून यासंदर्भातील अहवाल आल्यानंतर प्रत्यक्ष नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असे बुलढाणा वन विभागातील प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी अभिजित ठाकरे म्हणाले होते.


इतर महत्वाच्या बातम्या 


Buldhana News: वाघाची शिकार अन् 'त्या' वक्तव्यामुळे शिंदे गटाचे आमदार अडचणीत? वन विभागाच्या अहवालाकडे साऱ्यांचे लक्ष