Buldhana News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या महायुतीच्या घटक पक्षांची बैठक (Mahayuti Meeting) व मेळावा आयोजित करण्यात आला. मात्र या मेळाव्यात जिल्ह्यातील भाजपच्या आमदार श्वेता महाले (Shweta Mahale) आणि आकाश फुंडकर (Akash Phundkar) यांना व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. 


भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अर्जूनराव वानखेडे (Arjunrao Wankhede) यांनी पत्रकार परिषद घेऊन लोकसभेची उमेदवारी खा. प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांना दिल्यास पक्षाचे काम भारतीय जनता पक्षाचे (BJP) पदाधिकारी या नात्याने आम्ही करणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे. 


शिंदे गटाकडून गटातटाचे राजकारण


अर्जूनराव वानखेडे म्हणाले की, आतापर्यंत भाजपच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला कार्यक्रमासाठी शिंदे गटाने बोलावले नाही. त्यांनी जाणीवपूर्वक श्वेता पाटील, आकाश फुंडकर यांचे फोटो डावलले आहेत. गटातटाचे राजकारण केल्याशिवाय यांचे पोट भरत नाही. शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव हे द्वेष भावनेने राजकारण करतात. त्यांनी आज मेहकर येथे महायुतीची बैठक बोलावली. मात्र यात आमच्या नेत्यांना डावलण्यात आले. आता त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून कुठलीच अपेक्षा करू नये. आम्ही त्यांना कुठलेही सहकार्य करणार नाही. भाजप संपवण्याचे काम या लोकांनी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भाजपकडून प्रतापराव जाधव यांना उमेदवारी मिळाली तर तुम्ही त्यांचा प्रचार करणार का? असे त्यांना वानखेडे यांना विचारले असता ते म्हणाले की, कमळ चिन्ह त्यांना मिळण्याचा काही प्रश्नच येत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. 


वरिष्ठ स्तरावर अहवाल पाठविणार


याबाबत वरिष्ठ स्तरावर अहवाल मी स्वतः पाठविला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. यामुळे खा. प्रतापराव जाधव यांना स्वतःच्याच विधानसभा मतदारसंघातून घरचा आहेर मिळाला आहे. भाजपा पदाधिकारी जर काम करणार नसतील तर बुलढाणा मतदारसंघात भाजपा दुसरा उमेदवार देणार का? प्रतापगड अभेद्य राहणार की भाजपा पदाधिकाऱ्यांची नाराजी खा. प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) दूर करणार हे बघणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र अशा प्रकारे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अर्जूनराव वानखेडे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


अजित पवारांची नवी चाल, शरद पवारांचा डाव उलटवण्यासाठी सुनील तटकरे अनंतराव थोपटेंच्या भेटीला


Raj Thackeray : राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांना शिवतीर्थवर बोलावलं, महायुतीतील एंट्रीपूर्वी महत्त्वाची बैठक