Truck Driver Strike : केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याला (New Motor Vehicle Act) सर्वत्र मोठ्या प्रमाणात विरोध होतांना पाहायला मिळत आहे. राज्यभरात आज सकाळपासून ठिकठिकाणी ट्रकचालक (Truck Driver) रस्त्यावर उतरून आंदोलन करतांना पाहायला मिळत आहे. कुठे चक्का जाम केला जात आहे, तर कुठे टायर पेटवले जात आहे. त्यामुळे अनेक महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यांच आंदोलनाचा परिणाम आता बस वाहतुकीवर देखील होतांना दिसत आहे. आज सकाळपासून सुरू असलेल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एकट्या भंडारा (Bhandara)आगारातून जवळ जवळ 250 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहे. या बस फेऱ्या रद्द झाल्याने सुमारे सात लाखांचा फटका भंडारा आगाराला बसला असून यात प्रवाशांचीही मोठी गैरसोय होत आहे.  


250 बस फेऱ्या रद्द, प्रवाशांचीही मोठी गैरसोय


केंद्र सरकारच्या नवीन मोटार वाहन कायद्याबाबत ट्रकचालकांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे. या कायद्याला देशभरातील ट्रकचालकांकडून विरोध होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे याचे पडसाद देशासह राज्याच्या कानाकोपऱ्यात उमटतांना बघायला मिळत आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर  भंडारा आगारातील नागपूरच्या दिशेनं जाणाऱ्या सुमारे 250 बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. ट्रक चालकांनी नागपूर - कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावर नागपूर जिल्ह्यात बंद पुकारला आहे. अगदी सकाळपासून भंडारा आगारात अनेक प्रवासी नागपूरच्या दिशेने प्रवास करण्याकरिता पोहोचलेत. अनेकांनी बसचे तिकीटही काढले. मात्र, त्यानंतर वाहकांनी काढलेले त्यांचे तिकीट रद्द करीत त्यांना तिकिटाचे पैसे परत केले. बराच वेळपर्यंत प्रवाशांना नागपूरच्या दिशेनं कुठलीही बस मिळाली नसल्यानं अनेकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे.


असा आहे नवीन कायदा


नवीन मोटार वाहन कायद्यानुसार ट्रकमुळे एखादा व्यक्ती जखमी झाल्यास त्याला तात्काळ रुग्णालयात नेले पाहिजे, तसे न केल्यास आणि ट्रकचालक दोषी आढळून आल्यास त्याला सात वर्षांची शिक्षा आणि सात लाख रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. भारतात 28 लाखांहून अधिक ट्रक चालक 100 अब्ज किलोमीटरचे अंतर कापतात. या ट्रकवर 50 लाखांहून अधिक लोकं काम करतात. अशा परिस्थितीत ट्रकमुळे होणारे रस्ते अपघातही सर्रास घडत आहेत. त्यामुळेच सरकारने नवीन कायदा आणला असल्याचे बोलले जात आहे.


गोंदियात टायर जाळून केंद्र सरकारचा निषेध 


केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्यानुसार यापुढे अपघातास जबाबदार ट्रकचालकास 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकाराला जाणार आहे. दरम्यान, याच कायद्याला देशभरात विरोध होत असून, चालकांनी थेट संपाची हाक दिली आहे. याचे अनुषंगाने गोंदिया शहरातील कुडवा चौक येथे आज नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच टायर जाळून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी रामनगर पोलिसांनी 13 चालकांना ताब्यात घेतले आहे.


बुलढाण्यात टायर जाळून महामार्ग अडवला


बुलढाणा जिल्ह्यात देखील ट्रक चालक आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मलकापूर-घोडसगाव नजिक रस्त्यावर टायर जाळून महामार्ग अडवण्यात आला आहे. गेल्या एक तासांपासून महामार्ग अडवून वाहन चालकांची घोषणाबाजी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अपघात झाल्यानंतर पळून जाणाऱ्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या नवीन नियमाला वाहन चालकांनी यावेळी विरोध केला आहे. या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या असून, पोलिस आंदोलनस्थळी पोहचले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या: