Truck Driver Strike : केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याला (New Motor Vehicle Act) मोठ्या प्रमाणात विरोध होतांना पाहायला मिळत आहे. राज्यभरात आज सकाळपासून ठिकठिकाणी ट्रकचालक (Truck Driver) रस्त्यावर उतरून आंदोलन करतांना पाहायला मिळत आहे. कुठे चक्का जाम केला जात आहे, तर कुठे टायर पेटवले जात आहे. त्यामुळे अनेक महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारने आणलेल्या नवीन वाहन कायद्यानुसार यापुढे अपघातास जबाबदार ट्रकचालकास दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकाराला जाणार आहे. दरम्यान याच कायद्याला देशभरात विरोध होत असून, ट्रकचालक थेट रस्त्यावर उतरले आहेत. 


नागपूरमध्ये चक्काजाम 


नागपूर-भंडारा राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालकांनी चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. अपघातानंतर जखमींना मदत न करता पळून जाणाऱ्या वाहन चालकांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, या केंद्र सरकारच्या नव्या निर्णयाच्या विरोधात ट्रकचालक हे चक्काजाम आंदोलन करत आहेत. या कायद्यात वाहन चालक खास करून ट्रक चालकांविरोधात एकतर्फी कारवाईची तरतूद करण्यात आली असल्याचा आरोप होत आहे. अपघाताच्या स्थळावर थांबल्यावर चूक नसतांना देखील लोक ट्रकचालकाला मारहाण करतात. त्यामुळे आपला जीव वाचवण्यासाठी ट्रकचालक पळून जातात. मात्र, नंतर ते पोलिसांकडे जाऊन माहिती देतात. त्यामुळे हा कायदा वाहन चालकांच्या विरोधात असल्याची प्रतिक्रिया देत ट्रकचालकांनी चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. याचवेळी नागपूरच्या चौदा मैल येथे ट्रकचालकांनी कोलकत्ता-नागपूर- मुंबईनागपूर- भोपाळ राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला आहे. 


घोडबंदर येथे चक्काजाम...


केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याला देशभरात विरोध होत असून, टँकरचालकांनी थेट संपाची हाक दिली आहे. हा नवीन कायदा रद्द करा अशी मागणी करत बीपीसीएल, एचपीसीएल आणि इंडियन ऑइल या तिन्ही कंपन्यांचे पेट्रोल-डिझेल पुरवठा करणाऱ्या टँकरचालकांनी तीन दिवसीय संप पुकारला आहे.  आज घोडबंदर येथूल फाऊन्टन हॅाटेलजवळ ट्रक चालकांनी चक्का जाम केला आहे.  त्यामुळे तेथे वाहतुक कोंडी झाली आहे. वाहतुक पोलीस वाहतुक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करत आहे.


गोंदियात टायर जाळून केंद्र सरकारचा निषेध. 


केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्यानुसार यापुढे अपघातास जबाबदार ट्रकचालकास 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकाराला जाणार आहे. दरम्यान, याच कायद्याला देशभरात विरोध होत असून, चालकांनी थेट संपाची हाक दिली आहे. याचे अनुषंगाने गोंदिया शहरातील कुडवा चौक येथे आज नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच टायर जाळून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी रामनगर पोलिसांनी 13 चालकांना ताब्यात घेतले आहे.


बुलढाण्यात टायर जाळून महामार्ग अडवला...


बुलढाणा जिल्ह्यात देखील ट्रक चालक आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मलकापूर-घोडसगाव नजिक रस्त्यावर टायर जाळून महामार्ग अडवण्यात आला आहे. गेल्या एक तासांपासून महामार्ग अडवून वाहन चालकांची घोषणाबाजी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अपघात झाल्यानंतर पळून जाणाऱ्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या नवीन नियमाला वाहन चालकांनी यावेळी विरोध केला आहे. या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या असून, पोलिस आंदोलनस्थळी पोहचले आहेत. 


आंदोलनाचे पडसाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 


छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील या आंदोलनाचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारच्या नवीन कायद्या विरोधात अजिंठ्यातील शिवना येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. सोबतच पैठण तालुक्यातील बिडकीन येथील पोलीस ठाण्यात देखील ट्रक चालकांच्या वतीने निवेदन देण्यात आले. तसेच, यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Truck Driver Strike: नवीन मोटार वाहन कायद्याला विरोध करण्यासाठी पेट्रोल डिझेल कंपनीचे ट्रकचालक आजपासून संपावर