Bhandara News : छोट्या मुलांपासून ते वयोवृद्धांचे वाढदिवस साजरे करण्यात येत असल्याचे आपण नेहमी बघतो. मात्र, झाडांचे वाढदिवस कधी केल्याचे बघितले किंवा ऐकीवात नाही. भंडारा (Bhandara District) जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक शाळेत (Tree Birthday) शिक्षकांनी झाडाचा बारावा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. नेहमी नवोपक्रम राबवणाऱ्या शाळेत झाडाचा वाढदिवस साजरा केल्याने त्याची जिल्ह्यात सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.
लाखनी तालुक्यातील खराशी या आळ मार्गावरील गावातील जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक शाळेची ख्याती अवघ्या राज्यात आहे. कॉन्व्हेंटच्या तुलनेत जिल्हा परिषदची खराशी येथील ही शाळा कुठेही मागे नाही. या शाळेतील शिक्षक सतीश चिंधालोरे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व शिक्षकांनी मिळून शाळेच्या आवारात 8 ऑगस्ट 2010 ला वृक्षारोपण केले होते. त्या झाडाला 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने वृक्षाचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात यावर्षी साजरा केला. शिक्षक आणि वृक्षाचा वाढदिवस एकाच दिवशी असल्याचे औचित्य साधून नाविन्यपूर्ण प्रयोग साजरे करणाऱ्या शाळेत हा वाढदिवस विशेष रुपात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला.
'वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे'
त्यानिमित्ताने वृक्षारोपणाचे महत्व, वृक्ष संगोपन व संवर्धन का गरजेचे आहे, हे उपस्थित विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. लहान वयातच निसर्गाशी नाते जोडले जावे हा त्यामागचा उद्देश वाढदिवस असणारे शिक्षक चिंधालोरे यांनी सांगितले. झाडांचे संवर्धन, संगोपनाची जबाबदारी शिक्षकांनी उपस्थित विद्यार्थ्यांना वाटून दिली. सदर उपक्रमात बहारदार तसेच औषधीय गुणधर्म असलेले वृक्ष शाळा परिसरात लावण्यात आले. वृक्षाच्या वाढदिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना गोड जेवण देण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी नृत्य करत जल्लोष साजरा केला. या उपक्रमाचे पालक आणि गावकरी यांच्याकडून कौतुक केले जात आहे. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मुबारक सैय्यद, योगीराज देशपांडे, वनिता खराबे, मोनिका झलके, कौशल्या आठोळे, यामिनी लांबकाने तसेच गावकरी आणि पालक उपस्थित होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या