Nashik Bus Fire : नाशिक (Nashik) औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौफुली जवळ शनिवारी सकाळी पहाटेच्या सुमारात बस आणि ट्रक अपघात (Nashik Bus Fire) झाला आणि यामध्ये 12 जणांचा मृत्यू झालेला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसह (CM Eknath Shinde) इतर आजी माजी पालकमंत्री, त्याच पाठोपाठ स्थानिक लोकप्रतिनिधी अपघातस्थळी पाहणी करून उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र अपघाताला दोन दिवस उलटून गेले असले तरी प्रशासनकडून अद्यापही ठोस पाऊले उचलले गेली नसल्याचे चित्र आहे. 


दोन दिवसांपूर्वी नाशिककरांना सुन्न करणारी दुर्दैवी घटना शहरातील औरंगाबाद रोडवर क्षणार्धात होत्याच नव्हतं झालं. जवळपास बारा प्रवाशांना या अपघातात  गमवावा लागला. त्यानंतर या घटनेची मुख्यमंत्र्यांनी दखल घेत ते स्वतः घटनास्थळी दाखल झाले. त्याचबरोबर पालकमंत्री दादा, खासदार हेमंत गोडसे स्थानिक पोलीस प्रशासनांसह जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत अपघाताची पाहणी केली. यानंतर तात्काळ मिरची चौफुलीवर म्हणजेच ज्या ठिकाणी अपघात झालेला होता. त्या ठिकाणी रस्ते उपपयोजना करण्याचे आदेश देण्यात आले. यामध्ये गतिरोधक असेल, पांढरे पट्टे असतील, सिग्नल यंत्रणा याचबरोबर इतर ज्या काही सुविधा वाहतुकीसाठी करण्यात येतील त्या करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. 


मात्र या भीषण अपघातास दोन दिवस उलटूनही अद्याप प्रशासनकडून कोणतीही ठोस पाऊले उचलण्यात आली नसल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी गतिरोधक करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. दरम्यान अपघातानंतर दिलेल्या सुचनांचा तात्काळ पाठपुरावा होईल मात्र आजही परिस्थिती जैसे थे असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. त्यामुळे केवळ आश्वासने द्यायची, आणि वेळ मारून न्यायची आणि जैसे थेच परिस्थिती ठेवायची असाच एकंदरीत प्रशासनाचा कारभार आहे का? हा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.  आज देखील सदर चौफुलीवर भरधाव वेगाने वाहने सुसाट जात आहेत. सिग्नल यंत्रणा कार्यान्वित असली तरी न जुमानता वाहने बेदरकारपद्धतीने चालवली जात असल्याने प्रशासन आणखी अपघात होण्याची वाट बघतंय का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. 


दोन दिवसानंतरही उपाययोजना नाहीच! 
दरम्यान नाशिकच्या बस ट्रक अपघाताला दोन दिवस उलटूनही अद्यापही या चौफुलीवर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. दोन दिवसात काम सुरु होईल, असे आश्वासन अपघात झाला त्या दिवशी देण्यात आले होते. मात्र आता दोन दिवस उलटूनही काहीच काम झाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. लवकरात लवकर या ठिकाणी उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे. शिवाय पुढील काही दिवसात उपायोजना न राबविल्यास स्थानिक नागरिकांकडून प्रशासनांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.