Bhandara : आपल्या जन्मदात्याची प्रकृती ढासळल्यानं मदतीची याचना करणाऱ्या लेकाला ना अँब्युलन्स, ना कुणाची मदत भेटली. अशात या मुलावर चक्क आपल्या पित्याला हातगाडीवर रुग्णालयात आणण्याची वेळ आलीय. हा धक्कादायक प्रकार भंडाऱ्यात घडला आहे. 


 


चक्क हातगाडीवर वडिलांना ठेवून जिल्हा सामान्य रुग्णालयात आणलं


वडिलांचा प्रकृती ढासळल्याने त्यांना हॉस्पीटलमध्ये अॅडमिट करणं गरजेचं होतं. यासाठी मुलानं जवळचं असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेत ॲम्बुलन्सची मदत मागितली. मात्र, ती त्याला वेळेत मिळाली नाही. किंबहुना परिसरातील कुणीही त्याच्या मदतीला धावून आला नाही. त्यामुळे वडिलांवर वेळेत उपचार व्हावे, यासाठी त्याने चक्क हातगाडीवर वडिलांना ठेवून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणलं. हा संपूर्ण धक्कादायक प्रकार रात्री भंडाऱ्यात घडला.


 


ना अँब्युलन्स मिळाली, ना कुणाची मदत


जग्गा मडावी असं रूग्णाचं नावं आहे. ते भंडारा शहरातील टप्पा मोहल्ला येथील रहिवासी आहेत. त्यांचं कुटुंब मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यामुळं घरातील परिस्थिती अगदी बेताची आहे. त्यात, जग्गा मडावी यांची मागील काही दिवसांपासून प्रकृती खराब होती. त्यात कालपासून त्यांनी काहीही खाल्लं तरी, उलटी करायचे. त्यामुळं प्रकृती ढासळत चालली असल्यानं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेता यावं, म्हणून त्यांच्या मुलानं धावत जातं जिल्हा सामान्य रुग्णालय गाठलं. मात्र, त्यांना वेळेत ॲम्बुलन्स मिळाली नाही. किंवा त्यांना मदतही केली नाही. त्यामुळं मुलानं बापावर वेळीच उपचार व्हावा, यासाठी कुठलाही विचार नं करता, हातगाडीवर बापाला ठेवून थेट भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय गाठत भरती केलं. 


व्हिडीओ व्हायरल 


एकीकडे राज्य प्रगतीपथावर पोहचत असल्याचं सांगितलं जातं असतानाचं दुसरीकडं भंडाऱ्यात रुग्णाला वेळीच उपचारासाठी ॲम्बुलन्स मिळत नसल्याचा प्रकार समोर आल्यानं संतापही व्यक्त होत आहे. यात वृद्ध रूग्णाला हातगाडीवर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय आणल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. ज्यावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 


 


हेही वाचा>>>


Bengaluru Blast : 'आईचा फोन आला नसता तर, आज मी जगात नसतो...', बेंगळुरू स्फोटाच्या साक्षीदाराने सांगितला थरारक अनुभव