Bhandara, Gondia Lok Sabha Election 2024 : आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाने मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे. अश्यातच गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्रात (Bhandara-Gondiya Lok Sabha Constituency) तब्बल 3.50 लाख मतदार असलेल्या पोवार समाजाने निर्वाणीचा इशारा दिला आहे. येत्या निवडणुकीत पोवार समाजाचा उमेदवार देण्याची मागणी समाजबांधवांनी केली आहे.


पोवार समाजाचा निर्वाणीचा इशारा 


गोंदिया-भंडारा लोकसभेची जागा महाविकास आघाडीकडून काँग्रेसकडे तर, महायुतीकडून भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. गोंदिया-भंडारा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने पोवार समाज बांधव असून येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून पोवार समाजाचा उमेदवार देण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. यापूर्वी 1980 पासून तर 2009 पर्यंत पोवार समाजाचे 4 खासदार लोकसभेवर निवडून आले आहेत. 


1980 पासून तर 2009 पर्यंत पोवार समाजाचे चार खासदार विजयी


● 1980 आणि 1984 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून पोवार समाजाचे नेते केशवराव पारधी हे निवडुन आले होते. 


● 1989 आणि 1991 च्या निवडणुकीत भाजपकडून पोवार समाजाचे नेते खुशाल बोपचे हे निवडुन आले होते. 


● 1999 आणि 2004 च्या निवडणुकीत भाजप पक्षाकडून पोवार समाजाचे चुन्नीलाल ठाकुर हे निवडुन आले होते. 


● 2004 आणि 2009 च्या निवडणुकीत भाजप पक्षाकडून पोवार समाजाचे नेते शिशुपाल पटले हे निवडुन आले होते. 


पोवार समाज बांधवांची नाराजी


त्यानंतर 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पोवार समाजाला उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे पोवार समाज बांधवांनी नाराजी व्यक्त करत 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये आमचाच उमेदवार हवा अशी मागणी केली आहे. 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या राजा भोज यांच्या जयंतीनिमित्त महारॅली काढत पोवार समाज बांधवांनी शक्ती प्रदर्शन देखील केले होते. 


त्यामुळे आता आगामी काळामध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये कुठला राष्ट्रीय पक्ष पोवार समाजाच्या प्रतिनिधीला निवडणूक लढण्यासाठी संधी देतो काय? याकडे पोवार समाजाचे लक्ष लागून आहे.


भंडारा - गोंदिया लोकसभा मतदारसंघ


भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्याचा मिळून एक लोकसभा मतदारसंघ (Bhandara Gondiya loksabha constituency) आहे. या मतदारसंघात कायम भाजप,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सामना होत राहिला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. 2019 च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने भंडाऱ्याचे नगराध्यक्ष असलेले सुनील मेंढे (Sunil Mendhe) यांना उमेदवारी दिली. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या जागेवर माजी शिक्षण राज्यमंत्री नाना पंचबुद्धे (Nana panchbuddhe) यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत भाजपचे मेंढे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पंचबुद्धे यांचा पराभव करीत ही जागा पुन्हा एकदा भाजपकडे खेचून नेली


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Bhandara Gondiya loksabha : प्रफुल्ल पटेलांचा दावा, भाजपकडून मेंढेसह फुके इच्छुक; भंडारा-गोंदियाचा तिढा सुटणार कसा?