Bhandara News : आजही देशाच्या अनेक भागात शेतकरी पारंपरिक पद्धतीनेच पिकाची लागवड करताना दिसत आहेत. अनेकवेळा शेतकऱ्यांना (farmers) अपेक्षीत नफा मिळत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळं आता शेतकऱ्यांसाठी सलाम किसानने (Salam Kisan) पुढाकार घेतला आहे. सलाम किसान ही एक चळवळ म्हणून शेतकऱ्यांसाठी काम करणारा प्लॅटफॉर्म तयार झाला आहे. तंत्रज्ञानामार्फत अवघ्या 90 सेकंदात आता माती परीक्षण केलं जात आहे. भंडाऱ्यातील (Bhandara) पवनी येथे शेतकऱ्यांना ड्रोनचे प्रशिक्षणही देण्यात आले.  


कमी खर्चात अधिक उत्पन्न घेण्यासाठी मार्गदर्शन होणार


सलाम किसानच्या माध्यमातून शेतीला लागणारा खर्च कमी होईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल यासाठी सलाम किसानने पुढाकार घेतला आहे. तंत्रज्ञानामार्फत अवघ्या 90 सेकंदात आता माती परीक्षण केलं जात आहे. दररोज बदलणारे हवामान अंदाज, शेतातील माती कोणत्या पिकासाठी योग्य आहे, कमी खर्चात अधिक उत्पन्न घेणाऱ्या पिकाची लागवड करणे, विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती करणे आणि त्यातून आर्थिक संपन्नता मिळवण्यासाठी सलाम किसानने पुढाकार घेतल्याची माहिती अग्री ऑपरेशन मॅनेजर परेश कुल्लरकर यांनी दिली. भंडाऱ्यातील पवनी येथे शेतकऱ्यांना ड्रोनचे प्रशिक्षणही देण्यात आले.  


सलाम किसानच्या माध्यमातून अल्प दरात आधुनिक साधने उपलब्ध


शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी आणि कमी खर्चात त्यांच्या शेतीचं योग्य नियोजन व्हावं, यादृष्टीनं भंडाऱ्यातील पवनी इथं सलाम किसानच्या माध्यमातून मोफत प्रशिक्षण आणि माती परीक्षण आयोजित केलं होतं. यात शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती. यात शेतकऱ्यांनी आणलेल्या मातीचं आयआयटी कानपूरनं तयार केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अगदी 90 सेकंदात माती परीक्षण करुन देण्यात आलं. यापूर्वी माती परीक्षणाला दोन ते तीन दिवसाचा कालावधी लागत होता. आता केवळ 90 सेकंदात त्याचा निकाल मिळणार असल्यानं शेतकरी सुखावला आहे. यासोबतच पिकांवर फवारणी करण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी ड्रोन फवारणी, आधुनिक साधने सलाम किसान अगदी अल्प दरात उपलब्ध करुन देत आहे. त्याचेही प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखवण्यात आले.


सलाम किसानच्या माध्यमातून 'या' सुविधा देण्यात येणार


सलाम किसानने विविध प्रकारची माहिती शेतकऱ्यांना देण्याच्या दृष्टीने स्टॉलही लावले आहेत. शेतकऱ्यांना अल्पावधीत आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी यासाठी लॉन्च केलेल्या नवीन ॲपची माहितीही शेतकऱ्यांना देण्यात आली. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अचूक हवामान अंदाज, माती परीक्षण, पीक दिनदर्शिका, कीड आणि रोग शोधणे, कृषी तंत्रज्ञानाचा सल्ला, ड्रोन सुविधा, वित्त मार्गदर्शन, वाहतूक सुविधा, सलाम किसान शॉप, बाजार भाव याची माहिती देण्यात येणार आहे. राज्यात सर्वत्र किसान सलामचा कार्यक्रम सुरु असून यात आता हजारो शेतकरी जुळत आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या:


Nashik News : आभाळ फाटलं तिथं ठिगळं लावायचं कुठं? नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अश्रू अनावर, 145 गावांना फटका