भंडरा:  भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील बहुचर्चित सोनी हत्याकांडाचा (Soni Murder Case) आज अंतिम निकाल लागला. महाराष्ट्राला हादरवून सोडणारं  सोनी हत्याकांड प्रकरणातील सातही आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.  भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यात 2014 मध्ये झालेल्या सोनी हत्याकांडाचा अखेर 9 वर्षांनंतर निकाल लागल .  सातही आरोपींना  जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जी.अस्मर यांच्याकडून निकाल जाहीर करण्यात आला. कोर्टाने निकाल जाहीर करताच  आई- वडील आणि लहान भावाच्या आठवणीनं मुलीला अश्रू आवरता आले नाही. 


हे हत्याकांड 26 फेब्रुवारी 2014 रोजी झालं.  तुमसर येथील सोने-चांदी आणि हिऱ्याचे व्यापारी संजय सोनी, त्यांची पत्नी पूनम आणि बारा वर्षीय मुलगा धृमील यांची निर्घृणपणे हत्या करून घरातील तिजोरीतील सुमारे पाच कोटींच्या दागिन्यांसह आरोपीनं पोबारा केला होता. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकारी पक्षाकडून युक्तिवाद केला. विश्वासू चालकानेच सोनी कुटुंबाचा घात केल्याचं सिद्ध झालं. या प्रकरणी 275 पानांचं निकालपत्र तयार करण्यात आलं. तर 800 पानांचं दोषारोपपत्र न्यायालयात सादर केलं होतं आणि पाच वर्ष हा खटला चालला


कोर्टात सुनवणी सुरू होताच मुलगी हिरणला भावनांचा इतका वेळ रोखून ठेवलेला बांध हळूहळू फुटायला लागला होता. न्यायाधीशांनी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावताच  मुलीला अश्रू अनावर झाले हे दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे देखील पाणावले. विशेष म्हणजे, या तिहेरी हत्याकांडात ज्या निरागस धृमीलची हत्या झाली, त्याचा आज जन्मदिवस आहे. मृतक लहान भावाच्या जन्मदिवसीच न्यायालयाचा निकाल आल्यानं आई - वडिलांच्या आत्म्याला शांती आणि समाधान मिळाले असावे, अशी प्रतिक्रिया या मृतक संजय आणि पुनम यांची मुलगी हिरण हिनं दिली.


 तुमसर येथील सोन्या-चांदीचे व्यापारी संजय सोनी (42), त्यांची पत्नी पूनम सोनी (40) बारा वर्षीय मुलगा धृमिल सोनी यांची अत्यंत निर्घृणपणे त्यांचा चालक आणि त्यांच्या सहकाऱ्यानं हत्या केली होती. या हत्याकांडानंतर आरोपींनी सोनी यांच्या घरातील आजच्या बाजार भावानुसार सुमारे पाच कोटींचे सोन्या-चांदीचे दागिने लांबविले होते. 26 फेब्रुवारी 2024 ला संजय सोनी हे त्यांच्या चालकासह वाहनाने गोंदिया येथे सोने आणि चांदी खरेदी आणि विक्रीसाठी गेले होते. तिथून परत येत असताना गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील बिरसी फाट्यावर चालकाने संजय सोनी यांचा नायलॉनच्या दोरीनं गळा आवळून हत्या केली. त्यानंतर वाहनामध्ये मृतदेह टाकून चालक घरी पोहोचला. त्यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास चालकाने सुनी यांची पत्नी पूनम आणि मुलगा धृमील यांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करून दागिने पळविले होते.