भंडारा : विधान परिषद निवडणुकीमध्ये (Vidhan Parishad Election) क्रॉस व्होटिंग केल्याचा ठपका काँग्रेसचे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) यांच्यावर लावण्यात आला होता. यामुळे हिरामण खोसकरांच्या इगतपुरी (Igatpuri) मतदारसंघासह राज्यभरात खळबळ उडाली. आता हिरामण खोसकर यांनी भंडाऱ्यात (Bhandara) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या चारभट्टी येथील श्रावणमास समाप्ती आणि हनुमान चालीसा पठण कार्यक्रमात उपस्थिती लावली. नाना पटोले आणि हिरामण खोसकर हे एकाच मंचावर दिसून आल्याने राजकीय वर्तुळात आता याबाबत चर्चा रंगली आहे.


याबाबत बोलताना हिरामण खोसकर यांनी म्हटले आहे की, लोकांच्या प्रत्येक सुख दुःखात मी सहभागी होत असतो, त्यामुळं माझी या निवडणुकीसाठी तयारी सुरू झालेली असून गेल्या पाच वर्षात मी सातत्यानं कामाचा सपाटा लावला आहे. माझ्यावर आरोप कसा लावला याची मला कल्पना नाही. पक्षांने सांगितलेल्या उमेदवारांनाच मी मतदान केलं आहे. यात शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्यासह सात लोकांना मतदान करायचं, असं सांगितलं होतं. त्यानुसार मी मतदान केले. पक्षाने सांगितल्याप्रमाणे मी मराठीतच मतदान केलं आहे. यानंतरही कशामुळे माझं नाव आलं हे मला माहित नाही. मी शंभर टक्के पक्षालाच मतदान केलं आहे, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. 


पक्ष माझ्यावर पुन्हा विश्वास टाकून उमेदवारी देणार


ते पुढे म्हणाले की, नाना पटोले यांचा निरोप मला मिळाला होता. त्यामुळेचं मी भंडारा येथील त्यांच्या श्रावणमास समाप्तीच्या कार्यक्रमाला आलो. मला शंभर टक्के खात्री आहे की, पक्षश्रेष्ठी माझ्यावर विश्वास ठेवतील आणि मलाचं उमेदवारी देतील. नाना पटोलेंनी त्यांच्या भाषणातून नाशिकच्या सप्तशृंगी गडावर (Saptashrungi Gad) नेहमी दर्शनाला जातात. आता भंडाऱ्याच्या चारभट्टी मंदिरात (Charbhatti Mandir) दर्शनाला या, असं वक्तव्य केलं. हे माझ्या निवडणुकीच्या दृष्टीनं मला उमेदवारी मिळण्याचं संकेत आहेत. पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी दिल्यानंतर मी माझ्या प्रचाराचा नारळ भंडाऱ्याच्या चारभट्टी मंदिरातून फोडेल, असा विश्वास हिरामण खोसकर यांनी यावेळी व्यक्त केला आहे. आता हिरामण खोसकरांच्या वक्तव्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या


Nashik Congress : नाशकात काँग्रेसमधील गटबाजी उघड, आमदार हिरामण खोसकरांचा फोटो होर्डिंग्जवरून गायब, चर्चांना उधाण


Hiraman Khoskar : विधानसभेआधीच काँग्रेस आमदार हिरामण खोसकरांची डोकेदुखी वाढली, स्थानिक भूमिपुत्रांनी घेतला मोठा निर्णय