Maharashtra Politics भंडारा :  ज्या पद्धतीनं पवार साहेबांबरोबर (Sharad Pawar) अनेक नेते, अनेक मतदारसंघातले इच्छुक लोक आज आमच्या पक्षांमध्ये येत आहेत. ज्या पद्धतीनं पवार साहेबांच्या नेतृत्वाकडं पाईप लाईन लागली आहे. आमच्या पक्षामध्ये पण जे आम्हाला सोडून गेलेत त्याच्यातले सुद्धा काही नेते परत येण्यासाठी इच्छुक आहेत. पण आम्ही काही सर्व नेत्यांनाच पक्षात घेणार नाही. त्याच्यामुळे आम्ही थर्मामीटर लावून पाहू कोण योग्य आहे, कोण नाही. कोणी मधल्या काळामध्ये जास्त तोंड उघडलेत, आमच्या पक्षातून गेल्यानंतर काय काय झालं, हे सर्व पाहून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ, असे मत राज्याचे माजी गृहमंत्री आणि  राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी बोलताना व्यक्त केलं आहे. ते भंडारा येथे बोलत होते.  


राज्यात आमचंच सरकार येणार ही काळया दगडाची पांढरी रेघ- अनिल देशमुख


आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं भंडाऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा ही हक्काची असून यावरील दावा सोडणार नसल्यानं इथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचाचं उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहील. त्यामुळं विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश अनिल देशमुख यांनी कार्यकर्त्यांना दिले.


विधानसभेच्या निवडणुका या ऑक्टोबरमध्ये लागायला पाहिजे होत्या. भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष हे निवडणुका घ्यायला घाबरतात. लोकसभेच्या निवडणुकीनंतर त्यांना भीती वाटतेय, निवडणुका कशा घ्यायच्या. जेव्हा केव्हा निवडणुका महाराष्ट्रात होतील तेव्हा महाविकास आघाडीचे सरकार येईल, ही काळया दगडावरची पांढरी रेघ आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर, गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा आणि अर्जुनी मोरगाव या तीन जागांवर आमचा दावा राहील आणि तो आम्ही आग्रही मागणी राहील. या जागा आम्ही सोडणार नाही. तुमसर विधानसभा ही जागा आमची हक्काची आहे आणि ती सोडणार नाही. नागपूर येथे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढण्याबाबत मी चर्चा ऐकली नाही, असं म्हणत स्मित हास्य करत अधिक न बोलता अनिल देशमुख यांनी या प्रश्नावर उत्तर न देता अधिकचं बोलणं टाळलंय. 


निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना सरकार बंद करेल - अनिल देशमुख 


लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने आदिवासींच्या बजेट मधले पैसे कमी केले. नगरपालिका महानगरपालिकेच्या विकास निधी वळती केले. हे सर्व पैसे राज्य सरकारने उडविले आहे. याची माहिती नगरपालिकेच्या सिईओ आणि अन्य अधिकाऱ्यांना जाऊन विचारा. राज्य सरकारची लाडकी बहीण योजना नसून ही लाडकी खुर्ची योजना आहे. निवडणूक होतपर्यंत ही योजना सुरू राहील निवडणूक झाल्यानंतर लाडकी बहिणी योजना बंद करण्यात येईल, असा आरोप अनिल देशमुख यांनी राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर केला. 


महाराष्ट्रात 50 कोटीत आमदार, कर्नाटकात तीच किंमत 100 कोटींवर


आमदारांना फोडण्यासाठी भाजप सरकारने 50 - 50 कोटी रुपये दिलेत. मागील अडीच वर्षांपासून राज्यांमध्ये तेच राजकारण सुरू आहे. काही पक्ष फोडलेत. इडी, सीबीआयचा धाक दिल्याने आमचे काही नेते पळालेत. महागाई वाढली आहे, तरुणांच्या हाताला काम नाही. एका एका आमदाराला 50 - 50 कोटी रुपये दिलेत 45 आमदारांचा हिशोब लावा. महाराष्ट्रात 50 कोटीचा भाव होता. तर कर्नाटकात तर हा भाव 100 कोटीवर पोहोचलेला आहे. अशा पद्धतीचं राजकारण महाराष्टानं कधीही पाहिलेला नाही, अशी सडकून टीका  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपवर केली. 


हे ही वाचा