Buldhana Latest News Upate in Marathi : एटीएममध्ये पैसे काढायला गेल्यावर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कधी एटीएम चालत नाही, तर कधी एटीएममधून पैसे निघत नाही, तर कधी एटीएमध्ये पैसे नसतात.. तर कधी सर्वर डाऊन असते. त्यामुळे प्रत्येकजण वैतागतो. असेच वैतागलेल्या एका व्यक्तीने एटीएमची स्क्रीन फोडल्याची घटना घडली आहे. बुलढाण्यातील मलकापूर येथील एसबीआय (SBI) शाखेत हा प्रकार घडला आहे. वारंवार एटीएमकार्ड टाकूनही पैसे निघत नसल्याने त्या व्यक्तीने एटीएम मशीनची स्क्रीन फोडली. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस याचा शोध घेत आहेत. पण या प्रकरणाची मलकापूरमध्ये चर्चा सुरु आहे. 


बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) एटीएम मशीन मध्ये वारंवार एटीएम कार्ड टाकूनही पैसे निघत नाही, याची अनेक लोकांना बँकेत तक्रारही केली. पण एका माथेफिरूने या एटीएम मशिनची स्क्रीन दगडाने फोडण्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे. या माथेफिरूने अनेकदा या मशीनमध्ये कार्ड टाकले, पण मशीनमध्ये रोकड उपलब्ध नसल्याने त्यातून पैसे येत नसल्याच्या रागातून या माथेफिरूने चक्क एटीएम मशिनची स्क्रीन दगडाने फोडली. एटीएम मशीनची स्क्रीन फोडल्यानंतर तो व्यक्ती पसार झाला. यावेळी येथील सीसीटीव्ही बंद असल्याने नेमका हा माथेफिरू कोण..? ते समजू शकलं नाही. मात्र बँकेकडून मलकापूर पोलिसात या संबंधी तक्रार दाखल करण्यात आली आहे. मलकापूर पोलिस त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. 


या आधी ही मलकापूर येथे असा प्रकार घडला होता


मलकापूर येथे वारंवार असे प्रकार घडत असल्याचं समोर आले आहे. यापूर्वीही लॉकडाऊन काळात एकाने पैसे निघत नसल्यामुळे एटीएम मशीनच फोडलं होतं. त्यामुळे एटीएम मशीनची सुरक्षा आता चव्हाट्यावर आली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे चोरट्याने पैसे निघत नसल्यामुळे फोडलेले मशीन किंवा चोरटा नेमका कोण होता ? हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आलं नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा एटीएम मशीनची सुरक्षा धोक्यात आलेली दिसत आहे. 


एसबीआयचं काय म्हणणं आहे?


मलकापूर येथे काल साधारणतः नऊ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला असल्याचा बँकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. पण जर एटीएम मध्ये रोकडच नसेल तर ती निघणार कशी. त्यामुळे माथेफिरूने अशा प्रकारे एटीएमची स्क्रीनच दगडाने फोडण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी आम्ही मलकापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.