Bhandara News : तब्बल 40 वर्षांपासून निर्माण कार्य सुरु असलेला भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील गोसीखुर्द धरण (Gosekhurd Dam) लवकरच पूर्ण होणार आहे. गोसीखुर्द संदर्भातील एक महत्त्वाचा टप्पा पूर्णत्वाच्या दिशेनं जात आहे. गोसीखुर्द धरणाची संबंधित असलेली नेरला उपसा सिंचन योजना (Nerla Upsa Irrigation Scheme) जवळपास पूर्ण झाली असून, अधिकाऱ्यांनी या उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून पहिल्यांदा प्रायोगिक तत्त्वावर पाणी सोडलं आहे. यामुळे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना (Farmers) सुखावणारी बाब म्हणजे, सोडलेलं पाणी 50 किमी लांब असलेल्या अंतिम गावापर्यंत पोहोचलेलं आहे. त्यामुळे तेथील शेतकरी चार दशकानंतर दारी पोहोचलेल्या पाण्यामुळे सुखावले आहेत. 


1984 मध्ये राजीव गांधींच्या हस्ते गोसीखुर्द धरणाची पायाभरणी


गोसीखुर्द धरणाची ( (Gosekhurd Dam) पायाभरणी 1984 मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या हस्ते झाली होती. तर प्रत्यक्षात बांधकामाला सुरुवात ही 22 एप्रिल 1988 मध्ये झाली होती. या धरणाची सुरुवातीची किंमत ही 388 कोटी रुपये होती. तर धरणाची आताची किंमत ही 20 हजार कोटी रुपये आहे. ओलिताखाली येणारं क्षेत्र हे 2 लाख 50 हजार 800 हेक्टर एवढं आहे. 


मोठ्या प्रमाणावरील शेतजमीन सिंचनाखाली येणार


नेरला उपसा सिंचन योजना ही गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत येणारी एक उपसा सिंचन योजना आहे. या योजनेद्वारे भंडारा, पवनी, लाखांदूर, लाखनी या तालुक्यातील मोठ्या प्रमाणावरील शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे. याचा या भागातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून, येथील बागायती शेती होणार आहे. ही योजना वैनगंगेच्या किनाऱ्यावर नेरला या गावाजवळ उभारण्यात आली आहे. ही विदर्भातील सर्वात मोठी उपसा जल सिंचन योजना आहे. 


कोरडवाहू शेती बागायती होणार 


नेरला उपसा सिंचन योजनेचे पाणी यंदा शेतकऱ्यांना मिळणार की नाही?, असा प्रश्न नेरला उपसा सिंचन योजनेच्या लाभार्थ्यांना पडला होता. कारण या भागात पाण्याची टंचाई होती. शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याचा पुरवठा होत नसल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. कोरडवाहू जमिनीवरील पीक पाण्याअभावी वाया जात होती. त्यामुळे शेतकऱ्यांना सातत्याने फटका बसत होता. आता हा प्रकल्प पूर्ण झाल्याने भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Bhandara News : खोदकाम एकाच्या शेतात, मोबदला दुसऱ्याला; गोसीखुर्द धरण प्रशासनाचा भंडाऱ्यात अजब कारभार