भंडारा : कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेनंतर भंडाऱ्यातील महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ञ डॉक्टरांची समिती नेमण्यात आली आहे. तसेच मृत महिलेच्या कुटुंबीयांना अडीच लाखांची मदत देण्यात येणार आहे. या निर्णयानंतर मृतकाच्या कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी तब्बल सात तासांपासून सुरू असलेला रास्ता रोको मागे घेतला मृतदेह ताब्यात घेतला. मेघा बनारसे असं मृत महिलेचं नाव असून ती भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील विरली या गावची रहिवासी होती.


कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्यानेच विवाहितेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत मृतकाचे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी मृतदेह महामार्गावर ठेवत रास्तारोको आंदोलन केलं होतं. हा प्रकार भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील विरली या गावात घडला. डॉक्टरांवर कारवाई होणार नाही, तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही असा निर्वाणीचा इशारा कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी दिला होता. 


प्रकरण चिघळत असताना जिल्हा पोलीस अधीक्षक तगडा पोलीस बंदोबस्तासह लाखांदूर तालुक्यातील विरली या गावात पोहोचले. दरम्यान, खासदार प्रशांत पडोळे हे सुद्धा गावात पोहचून मृतक मेघा बनारसे हिच्या कुटुंबीयांची भेट घेत प्रकरणाची माहिती जाणून घेतली. या प्रकरणात तब्बल सात तासापर्यंत मृतदेह महामार्गावर ठेवल्यानं या महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. 


जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक, उपविभागीय अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मृतकाच्या कुटुंबीयांची मनधरणी केली. या गंभीर प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी चार तज्ञ डॉक्टरांची समिती गठीत केली. मात्र, ग्रामस्थांना या समितीवर विश्वास नसल्यानं रोष व्यक्त केला. 


जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी पुढाकार घेत नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ञ डॉक्टरांची समिती या प्रकरणाच्या चौकशीसाठी गठीत करण्याचे सुचविले. यावर ग्रामस्थांनी सहमती देत तब्बल सात तासानंतर महामार्गावर ठेवलेला मृतदेह उचलायला आणि रात्री त्यावर अंत्यसंस्कार केला. ही चौकशी समिती पुढील तीन दिवसात चौकशी अहवाल देईल त्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आलं.


काय आहे प्रकरण? 


- मेघा बनारसे यांच्यावर सरांडी बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 16 नोव्हेंबरला कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली.
- मात्र त्यानंतर महिलेला पोटात खूप वेदना होत असल्यानं तिला भंडारा येथील साई हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
- त्यानंतर तिला पुढील उपचारासाठी 29 डिसेंबरला चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथील आस्था या खासगी रुग्णालयात हलविण्यात आलं.
- प्रकृती पुन्हा खालावल्यानं 18 जानेवारीला तिला ब्रह्मपुरी येथून नागपूरला हलविण्यात आलं. नागपूर इथं उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.


मृतकाच्या कुटुंबाला अशी मिळणार मदत


- मृतकाच्या परिवाराला तातडीची मदत म्हणून 25 हजार रुपये देण्यात आले.
- मृतकाच्या बालकांचं शासन पालकत्व स्वीकारेल 
- प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्ण कल्याण समिती आणि जिल्हा रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीच्या माध्यमातून प्रत्येकी एक लाख 25 हजार अशी एकूण अडीच लाखांची मदत मृताच्या कुटुंबाला दोन दिवसात मिळेल. 


ही बातमी वाचा: