Bhandara News : भंडारा जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. 8 ते 10 लाखांचा ट्रॅक्टर 90 टक्के सबसिडीवर मिळवून देण्याच्या नावावर आदिवासी बांधवांकडून 1 लाख 30 हजार रुपये तर, गैरआदिवासींकडून 3 लाख रुपये घेवून कोट्यवधींची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. दरम्यान शेतकऱ्यांची  फसवणूक करणारा घोटाळेबाजाच्या विरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल होताच तो मागील सहा महिन्यांपासून फरार होता. परिणामी पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान करत या घोटाळेबाजाला भंडारा पोलिसांनी गडचिरोलीतून अटक केली आहे. 


आदिवासीबहुल जिल्ह्यांत शेकडो बांधवांची फसवणूक, आरोपीला बेड्या 


पुढे आलेल्या माहितीनुसार एकट्या भंडारा किंवा गोंदिया जिल्ह्यातचं नव्हे तर, या घोटाळेबाजानं राज्यातील आदिवासीबहुल जिल्ह्यांसह मध्यप्रदेशात ही जाळे पसरवून नागरिकांकडून कोट्यवधींची फसगत केल्याचं आता समोर आलं आहे. मारोती अशोक नैताम (35) असं कोट्यवधींने नागरिकांना फसविणाऱ्याचं नावं आहे. तो मूळचा गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील जीमलगट्टा येथील रहिवाशी आहे. उच्च शिक्षित असलेल्या मारोती नैतामला मराठी, इंग्रजी, हिंदीसह एकूण नऊ भाषा बोलता येतात. त्यासोबतचं त्यानं नैतान या आडनावाचा गैरफायदा घेतला. नैताम हे आडनाव आदिवासींमध्ये आहे, मात्र हा ओबीसी (तेली) समाजाचा असतानाही त्यानं आदिवासी बांधवांना तो स्वतः आदिवासी असल्याचं सांगून आदिवासी बांधवांचा विश्वास संपादन केला.


तसेच या लखोबा लोखंडेनं भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यात चिचोली इथं जय बिरसा ट्रायबल फार्मर प्रोड्युसर लिमिटेड नावानं कंपनी स्थापन करून नागरिकांची कोट्यवधींनी फसवणूक केली. सबसिडीवर ट्रॅक्टर मिळविण्यासाठी अनेकांनी त्यांचे दागिने गहाण ठेवलेत, अनेकांनी शेती विकल्या तर काहींनी कर्ज घेऊन या ट्रॅक्टरसाठी या कंपनीत पैसे गुंतविले होते. आता हा लखोबा लोखंडे पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून भंडारा पोलीस त्याची चौकशी करीत आहे. 


पवनी नगर पालिकेच्या हद्दवाढीला बेटाळा ग्रामवासीयांचा विरोध


भंडारा जिल्ह्यातील पवनी नगरपालिकेची हद्दवाढ करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या हद्द वाढीला पवनी लगतच्या बेटाळा ग्रामवासीयांनी विरोध केला आहे. नगरपालिका असलेल्या पवनी शहराचा अद्याप विकास झालेला नाही. त्यामुळं बेटाळा गावाचा पालिकेच्या हद्दीत समावेश करू नये, असा ठराव ग्रामसभेत सर्व बेटाळावासीयांनी केला आहे.


हे ही वाचा