भंडारा : आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना भंडाऱ्यातील येरली येथे घडली आहे. यात 37 विद्यार्थांना विषबाधा झाल्याने त्यांना उपचारासाठी तुमसर येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 37 विद्यार्थ्यांपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, उर्वरित 33 जणांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे. 


भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील येरली येथील आदिवासी आश्रमशाळा गोंदिया एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून चालविण्यात येत आहे. या आदिवासी आश्रम शाळेत इयत्ता बारावी पर्यंत शिक्षण दिले जात आहे. तिथे सुमारे 325 विद्यार्थी निवासी शिक्षण घेत आहे. आज नेहमीप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना दुपारच्या सुमारास जेवण देण्यात आले. बटाटा, वाटाणा, भात, वरण, चपाती याच भोजन केल्यानंतर काही वेळाने विद्यार्थ्यांच्या पोटात दुखायला लागले. तर, काहींना चक्कर आली. याची तक्रार विद्यार्थ्यांनी शाळेच्या शिक्षकांकडे केली. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. 


सायंकाळनंतर विद्यार्थ्यांना पोटदुखी आणि उलटीचा त्रास अधिक जाणवू लागला. त्यामुळे सुरुवातीला या विद्यार्थ्यांना तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, हळूहळू आणखी विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने प्रकरण गंभीर झाले. रात्री उशिरापर्यंत 11 ते 17 या वयोगटातील 36 विद्यार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील चार यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.


विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती मिळताच जिल्हा परिषद शिक्षण सभापती रमेश पारधी यांनी रुग्णालयात जावून डॉक्टरांकडून माहिती घेत विद्यार्थ्यांची आस्थेने चौकशी केली. या आदिवासी शाळेत 325 विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने सर्वांना एकत्र तयार केलेले भोजनच दिले जातात. त्यामुळे कदाचित विषबाधा होणाऱ्यांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.


चौकशी होणार का?


राज्यातील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांचा मुद्दा अनेकदा चर्चेत येतो. आता भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचे प्रकरण घडले आहे. चार विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असल्याची संतापजनक प्रतिक्रिया सामान्य लोकांमध्ये उमटत आहे. या प्रकरणाची प्रशासनाकडून चौकशी होणार का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :