भंडारा : दुचाकीला भरधाव टिप्परने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील गर्भवती बहिणीचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर, भाऊ गंभीर जखमी झाला आहे. ही घटना भंडारा  शहरातील (Bhandara News) राजीव गांधी चौकात रात्री 10.30 वाजताच्या सुमारास घडली. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली.


त्यानंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करीत वाहतूक थांबवून रोष व्यक्त केला. संतप्त नागरिकांनी टिप्परची देखील मोठ्या प्रमाणात तोडफोड करीत पेटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, भंडारा पोलिसांनी (Bhandara Police) तात्काळ घटनास्थळ गाठत नागरिकांना रोखलं. घटनेनंतर परिसरात बराच काळ तणावाचे वातावरण परसले होते. अफसाना शेख (30) असे मृतक गर्भवतीचे नाव आहे. तर, कलीम शेख (35) असे गंभीर जखमी भावाचं नाव आहे. घटनेचा अधिक तपास भंडारा पोलीस करीत आहे.


गर्भवती बहिणीचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू 


भंडारा शहरातील कायम वर्दळीचा चौक असलेल्या राजीव गांधी चौकातून मृत अफसाना शेख ही भाऊ कलीम शेख सोबत दुचाकीवरून घराच्या दिशेने जात होती. दरम्यान एमएच 36 एए 3381 क्रमांकाचा टिप्पर गिट्टी घेऊन तुमसरकडे जात होता. तर राजीव गांधी चौकातून एमएच 36 टी 9801 क्रमांकाच्या दुचाकीवरून अफसाना आणि कलीम हे दोघे बहिण भाऊ रुग्णालयातून घरच्या दिशेने जात होते.


चौकातील एका वळणावर टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिली. टिप्परने दोघांनाही दुचाकीसह काही अंतर घासत नेले. यामध्ये अफसाना शेखचा जागीच मृत्यू झाला, तर कलीम शेख यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर संतप्त जमावाने या घटनेचा रोष व्यक्त करत टिप्परची तोडफोड करीत पेटविण्याचा प्रयत्न केला. योगायोगाने समोरून येणाऱ्या एका पोलिसांच्या वाहनाला हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. 


अपघातानंतर परिसरात तणाव


पोलिसांनी तत्काळ आपल्या वाहनातून या दोघांनाही एका खासगी रुग्णालयात पोहोचवले. डॉक्टरांनी अफसानाला मृत घोषित केले. अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या टिप्पर चालकाला जमावाने जबर मारहाण केली. त्याने जवळच असलेल्या पोलीस ठाण्यात धाव घेतली. टिप्परवर दगडफेक करण्याचाही प्रयत्न झाला. मात्र पोलिसांनी तातडीने धाव घेऊन गर्दी पांगविली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत राजीव गांधी चौकात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.


इतर महत्वाच्या बातम्या