Navi Mumbai Crime News: नवी मुंबई : नवी मुंबईतील (Navi Mumbai) धक्कादायक घटनेनं संपूर्ण शहर हादरलं आहे. प्रेयसीची हत्या करुन प्रियकरानंही आत्महत्या केल्याची हादरवणारी घटना नवी मुंबईत घडली आहे. नवी मुंबईतील कळंबोलीमध्ये ही घटना घडली. प्रियकरानं आधी प्रेयसीचा गळा आवळून हत्या केली आणि त्यानंतर स्वतः रेल्वेखाली उडी घेत आयुष्य संपवलं. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ज्या प्रेयसीची गळा आवळून प्रियकरानं हत्या केली होती, तिचा मृतदेह तब्बल एका महिन्यानंतर पोलिसांच्या हाती लागला आहे.  


नवी मुंबईतील कळंबोलीमध्ये राहणाऱ्या प्रियकरानं घराजवळच राहणाऱ्या आपल्या प्रेयसीचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्यानं रेल्वेखाली जाऊन स्वतःचं आयुष्यही संपवलं. घटनेचा खुलासा झाल्यापासून संपूर्ण शहरात खळबळ पसरली आहे. वैष्णवी बाबर (वय 19 वर्ष) आणि वैभव बुरुंगले (वय 24 वर्ष) या दोघांमध्ये गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पण कालांतरानं दोघांमध्येही खटके उडू लागले. भांडणं वाढली आणि वाद-विवाद रोजचेच झाले आणि अशातच वैभवच्या मनात संशयाचं भूत शिरलं. त्यातून त्यानं वैष्णवीच्या हत्येचा कट रचला. 2023 मध्ये वैभवनं वैष्णवीच्या हत्येचा कट रचला. 


प्रियकरानं कसा रचला हत्येचा कट?


वैष्णवीची हत्या कशी करणार? कुठे करणार? कशी करणार? या सर्व बाबी वैभवनं आधीच आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवल्या होत्या. त्याप्रमाणे वैभव वैष्णवीला खारघर हिलवर घेऊन गेला. खारघर हिलवर नेल्यानंतर वैभवनं तिची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर खारघर हिलवरुन तो परतला आणि जवळच असलेलं जुईनगर रेल्वे स्थानक त्यानं गाठलं. त्यानंतर तिथून जाणाऱ्या एका रेल्वेखाली उडी घेत त्यानं आपलं आयुष्य संपवलं. वैभवच्या आत्महत्येबाबत रेल्वे पोलिसांना माहिती मिळाली, त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि वैभवचं शव ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवलं. 


वैभवच्या आत्महत्येचा तपास करताना पोलिसांना त्याचा मोबाईल सापडला. मोबाईलमध्ये त्यानं वैष्णवीची हत्या केल्याचं टाईप करुन ठेवलं होतं. त्यासोबत LO1-501 असा एक सांकेतिक क्रमांक पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी खारघर हिल परिसरात सात दिवस शोध मोहीम राबविली, पण वैष्णवीचा मृतदेह काही सापडेना. अखेर पोलिसांनी त्या सांकेतिक क्रमांचा मागोवा घेण्याचं ठरवलं. पोलिसांनी सांकेतिक क्रमांकाची उकल करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. अखेर वैभवच्या मोबाईलमध्ये सापडलेला हा सांकेतिक क्रमांक म्हणजे, झाडाचा क्रमांक असल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी अखेर खारघर हिलवर ड्रोनच्या सहाय्यानं शोधण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी वैष्णवीचा मृतदेह आढळून आला. मोठ्या शिताफिनं आणि संयमानं नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण केला. तसेच, वैष्णवीची हत्या आणि वैभवच्या आत्महत्येचा उलगडा केला.