भंडारा: शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी वाहणाऱ्या पाटातून वाहणाऱ्या मासोळ्या पकडता याव्या म्हणून शेतकऱ्यानं तिथं जाळी लावली. या जाळीत मासोळ्या ऐवजी एक दोन नव्हे तर, चक्क तीन अजगर अडकलेत. ही घटना भंडाऱ्याच्या (Bhandara News) लाखनीतील रेंगेपार कोहळी गावाच्या हद्दीतील तेजराम घनमारे यांच्या शेतात घडली.


सध्या खरीप हंगाम सुरू असून भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भात पिकांची लागवड केली जातं. मागील काही दिवसांपासून पावसानं पाठ फिरविल्यानं भातशेती धोक्यात आल्यानं पिकांना वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करत आहेत. अशात गावालगत असणारा तलाव असो किंवा प्रवाहित नदी यातून पाणी आणून ती शेतातील पिकांना देण्याची कसरत शेतकरी करताना बघायला मिळत आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील रेंगेपार कोहळी इथले शेतकरी तेजराम घनमारे यांनीही  त्यांच्या शेतातील भात पीक वाचविण्यासाठी पाणी सोडले आहे. या पाण्यासोबत मासोळ्या जात असल्याचं त्यांच्या लक्षात आल्यानं त्यांनी शेतात जाणाऱ्या मासोळ्या पकडता यावं, यासाठी मासोळ्या पकडण्याची जाळी शेतातील वाहणाऱ्या पाटालगत लावली.


मासोळ्याऐवजी अडकलेत तीन अजगर


शेतातील भात पीक जगविता यावं म्हणून पाणी सोडताना त्यातून जाणाऱ्या मासोळ्या खाण्यासाठी पकडता येईल, या उद्देशानं शेतकरी तेजराम घनमारे यांनी मासोळ्या पकडण्याची जाळी लावली. पिकांना पाणी मिळाल्यानं भात पीक वाचलं मात्र, जाळ्यात मासोळी नाही. तर, चक्क साप अडकल्याचं दिसून आलं. अगदी जवळ जावून शेतकऱ्यानं जेव्हा बघितलं, तेव्हा त्यांची भंबेरीचं उडाली. कारण त्या जाळीत चक्क अजगर अडकल्याचं दिसून आलं.  एक अजगर नव्हता तर, तब्बल तीन अजगर तिथं असल्याचं बघून शेतकऱ्यानं यांची माहिती सर्पमित्रांना दिली.


ग्रीन फ्रेंड्स नेचर क्लबच्या सर्पमित्रांचा पुढाकार


शेतातील जाळीत तीन अजगर अडकल्याची माहिती ग्रीन फ्रेंड्स नेचर क्लबच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आली. यावेळी सर्पमित्र खेमराज हुमे, निलेश रहाटे, विरू पवनकर, पवन तिवाडे हे तातडीनं शेतात पोहचलेत. यानंतर त्यांनी अजगरांना बघितलं असता तर जाळीत अडकल्यानं जखमी झाले होते. मोठ्या शिताफीनं तब्बल तासभराच्या रेस्क्यू नंतर तिन्ही अजगरांना जाळीतून बाहेर काढलं.


वैद्यकीय उपचारानंतर सोडलं नैसर्गिक अधिवासात


सर्पमित्रांनी याची माहिती ग्रीन फ्रेंड्स नेचर क्लबचे कार्यवाह प्रा. अशोक गायधने यांना देण्यात आली. त्यानंतर जखमी तिन्ही अजगरांना लाखनीच्या पशू वैद्यकीय दवाखान्यात पशूधन विकास अधिकारी डॉ देशमुख यांच्या माध्यमातून उपचार करण्यात आलं. त्यानंतर त्यांना वन विभागाच्या स्वाधीन करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. या संपूर्ण प्रक्रियेत ग्रीन फ्रेंड्स नेचर क्लबचे अध्यक्ष अशोक वैद्य, सर्पमित्र पंकज भिवगडे, मयूर गायधने, सलाम बेग, विवेक बावनकुळे, धनंजय कापगते, यशपाल कापगते, मनीष बावनकुळे, नितीन निर्वाण, निलेश भैसारे आदींची महत्वाची भूमिका पार पाडली.


हे ही वाचा :


सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांमधून तेजस ठाकरे अन् टीमनं शोधला नव्या प्रजातीचा साप; नाव दिलंय 'सह्याद्रीओफिस'