Bhandara News : नक्षल प्रभावित क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरातील नागरिकांना पोलिसांचे तात्काळ संरक्षण आणि मदत मिळावे, या हेतूने गावात पोलीस मदत केंद्र (Police Help Center) सुरु करण्यात आलं. मात्र, भंडाऱ्यातील केसालावडा गावातील हे मदत केंद्र काही दिवसातच बंद पडले आणि ज्या इमारतीत हे पोलिसांचे दूरक्षेत्र केंद्र सुरु केले, त्या घर मालकाला पोलीस विभागाने भाडे (Rent) दिले नाही. त्यामुळे हा घर मालक भाड्यापासून वंचित असून त्याने पोलीस मदत केंद्राची मालमत्ता स्वतःच्या ताब्यात घेऊन तिथे आता पाळीव जनावरे (Animals) बांधायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता गृह विभागाची (Home Department) पोलीस मदत केंद्राची ही इमारत गुरांचा गोठा बनला आहे.


नागरिकांच्या सोयीसाठी पोलीस मदत केंद्राची सुरुवात पण...


भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील लाखनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हा प्रकार असून केसालावडा (पवार) या गावातील पोलीस दूरक्षेत्र केंद्रातील ही घटना घडली आहे. 3 नोव्हेंबर 2018 रोजी या पोलीस चौकीचे उद्घाटन भाजपचे तत्कालीन ऊर्जामंत्री तथा आताचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या हस्ते करण्यात आले होते. केसलवाडा (पवार) हे गाव लाखनी पोलीस स्टेशन हद्दीत असून ते नक्षल प्रभावित क्षेत्रात (Naxalite) येत असल्याने या परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी या पोलीस मदत केंद्राची सुरुवात करण्यात आली होती. काही दिवस या केंद्रातून नियमित कामकाज पार पडले, मात्र, कालांतराने हे मदत केंद्र बंद पडले. त्यामुळे पोलीस विभागाचे महत्त्वाचे दस्तावेज आणि साहित्य आजही त्याच ठिकाणी धूळखात पडलेले आहेत. 


पोलीस मदत केंद्राला गोठ्याचं स्वरुप


दरम्यान, या इमारतीचं भाडे मिळावे, यासाठी घर मालकाने वारंवार पोलिसांच्या वरिष्ठांकडे मागणी केली. त्यानंतरही त्यांना भाडे मिळाले नाही आणि मदत केंद्रही सुरु झालेले नाही. त्यामुळे संतप्त घर मालकाने या पोलीस चौकीत स्वतःची जनावरे बांधायला सुरुवात केली असून आता या पोलीस मदत केंद्राला जनावरांच्या गोठ्याचं स्वरुप आलं आहे. 


ग्रामस्थांचा गृहमंत्री फडणवीसांना सवाल


परिणामी या परिसरातील नागरिकांना पोलीस ठाण्याच्या संदर्भातील कुठलीही समस्या असल्यास 12 किलोमीटरचे अंतर कापून लाखनी पोलीस ठाण्यात पोहोचावं लागते. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) असून तेच भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने हे पोलीस मदत केंद्र सुरु होणार का? असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.