Bhandara: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर सडकून टीका केली आहे. दररोज सकाळी एक भोंगा वाजतो आणि अशोभनीय भाषेत बोलतो, त्यामुळे ‘आपला दवाखाना’मध्ये त्यांच्यावरच सर्वात आधी उपचार केले जातील, नाव न घेता अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी राऊतांवर केली. तर काकांनी तुमची हवा काढून टाकली म्हणत अजित पवारांवरही (Ajit Pawar) ते चांगलेच बरसले.
भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या निधीतून 264 कोटींच्या विविध विकासकामांचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित जनसमूदायाला मार्गदर्शन करताना श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले. दहा महिन्याच्या सरकारच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कामाने जगाला ओळख निर्माण करून दिली, त्यांचे काम विरोधकांच्या पचनी पडत नसून त्यांची सतत पोटदुखी होत असल्याचं श्रीकांत शिंदे म्हणाले.
या दरम्यान श्रीकांत शिंदेंनी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. अजित पवार यांनी काकांचं राष्ट्रीय अध्यक्षपद आपल्यालाच मिळेल अशी अपेक्षा बाळगली होती. मात्र त्यांच्या पहाटेच्या सरकारप्रमाणेच काकांनी त्यांची हवा काढून टाकली. आता त्यांना 'काका मला वाचवा' अशी म्हणण्याची वेळ आली असल्याची टीका श्रीकांत शिंदे यांनी अजित पवार यांच्यावर केली.
आदित्य ठाकरेंवरही टीका
गेली 25 वर्ष महापालिकेने मुंबईला कधीच खड्डेमुक्त केलेलं नाही, आता कॉन्ट्रॅक्ट त्यांच्या लोकांना मिळणार नाही म्हणून त्यांची पोटदुखी होत असल्याचं म्हणत श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) टीकेचे बाण सोडलेत. आम्ही नऊ वर्षांपासून लोकप्रतिनिधी आहोत तरी आम्हाला कॉन्ट्रॅक्टमध्ये लो प्राईस काय, हाय प्राईस काय, कमिशन काय हे कळत नाही, मात्र यांना हे सर्व कळतं, असं म्हणत श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंवर टीका केली. मुंबईची अवस्था सामान्य मुंबईकरांना माहित असून ते सुज्ञ असल्याचंही ते म्हणाले.
पवनीचा विकास होईल असंही दिलं आश्वासन
पवनी हे ऐतिहासिक शहर असून इथे साडेतीनशेपेक्षा अधिक मंदिरे आहेत. या गावाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे नक्कीच विकास निधी देतील आणि गावाचा विकास घडवून आणतील, असे आश्वासन खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिले आहे. पवनी गावाचा विकास करण्याच्या दृष्टीने एक चांगला डीपीआर तयार करून शासनाकडे पाठवावा, असेही श्रीकांत शिंदे यांनी सुचवले आहे.
त्यासोबतच गोसेखुर्द धरणाच्या बॅक वॉटरवर जलपर्यटनाच्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देता येईल आणि यामुळे भंडारा जिल्ह्याचं नाव देखील जागतिक पातळीवर पोहोचेल, अशी हमी खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली. यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासनही यावेळी श्रीकांत शिंदे यांनी दिलं.
हेही वाचा: